शिक्षकांना ही कोरोना विमा कवच लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:05 AM2021-01-09T04:05:38+5:302021-01-09T04:05:38+5:30
नागपूर : कोरोना साथरोग नियंत्रण उपाययोजना मोहिमेत काम करताना मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकांना विमा कवच लागू करण्यात आले असून त्याबाबतची ...
नागपूर : कोरोना साथरोग नियंत्रण उपाययोजना मोहिमेत काम करताना मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकांना विमा कवच लागू करण्यात आले असून त्याबाबतची माहिती शिक्षण संचालनालयाकडून मागविली आहे.
कोरोना साथरोग नियंत्रण मोहिमेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांना ५० लाख रुपयाचा विमा लागू करण्यात आला होता. परंतु या मोहिमेत काम करत असताना दुर्दैवाने काही शिक्षकांचा मृत्यू झाला. परंतु त्यांना या विमा कवचाचा लाभ दिलेला नाही. अलीकडेच शासनाने एक पत्र काढून राज्य सरकारी कर्मचारी व जि.प. गट क व ड कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव मागवून ते मंजूर केले. त्यानंतरही शिक्षकांना मात्र लाभ देण्यात आला नव्हता. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत अनेक शिक्षकांच्या सेवा संलग्न करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मोहिमेत काम करणाऱ्या शिक्षकांनासुद्धा विमा कवच लागू करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने शासनाकडे लावून धरली होती. अलीकडेच प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून याबाबत एक पत्र निर्गमित केले असून कोरोना साथरोग नियंत्रण मोहिमेत मृत्यू झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विमा कवचाच्या लाभाबाबतचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.