नागपुरात कोरोना ‘जेएन.१ व्हेरियंट’चा २०रुग्णांची नोंद; २ रुग्ण ग्रामीणमधील, ८ बरे, १२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये
By सुमेध वाघमार | Published: January 5, 2024 08:17 PM2024-01-05T20:17:40+5:302024-01-05T20:17:57+5:30
विदर्भात अकोलानंतर नागपुरात कोरोनाचा ‘जेएन.१’ व्हेरियंटचे रुग्णांची नोंद झाली.
नागपूर : विदर्भात अकोलानंतर नागपुरात कोरोनाचा ‘जेएन.१’ व्हेरियंटचे रुग्णांची नोंद झाली. तब्बल २० रुग्ण आढळून आले. यातील ८ बरे झाले असून १२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचाराखाली आहेत. या ‘अॅक्टीव्ह’ रुग्णांना सौम्य लक्षणे असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, यात ११ महिला आहेत.
कोरोनाचा ‘जेएन.१’ व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी कोरोना संशयीत व सौम्य लक्षणे आढळणाºया रुग्णांची चाचणी करा, अधिकाधिक चाचणी करण्यावर भर द्या, असे निर्देश प्रशासनाने आरोग्य विभागाला दिले आहेत. त्यानुसार चाचण्यांचा वेग वाढविण्यात आला. परंतु मागील आठवड्याभरात कोरोना रुग्णांची संख्या दहाच्या खाली होती. या दरम्यान आरोग्य विभागाने संशयित ४२ रुग्णांचे नमुने ‘नीरी’च्या प्रयोगशाळेत ‘जीनोम सिक्वेन्सिंग’साठी पाठविण्यात आले. यात ‘जेएन.१’ व्हेरिएंटचे शहरात १८ तर ग्रामीणमध्ये २ असे एकूण २० रुग्णांची नोंद झाली.
१२ ते ८४ वयोगटातील रुग्ण
आढळून आलेल्या ‘जेएन.१’ व्हेरिएंटचा रुग्णांमध्ये ११ महिला व ९ पुरुष आहेत. महिलांमध्ये १२, १५, २५, २९, ४०, ४५,५०, ५८,६८ व ७० तर, पुरुषांमध्ये १३, ४५, ५५, ५९, ७८ व ८४ वयोगटातील रुग्ण आहेत. यातील एकाही रुग्णाला हॉस्पिटलची गरज पडली नाही. यामुळे घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी
मनपा आरोग्य विभागामार्फत ‘जेएन.१’ पॉझिटीव्ह रुग्णांच्या घरी भेटी दिल्या जाणार असून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेवून त्यांची कोरोना चाचणी करणार असल्याची माहिती आहे. मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी सांगितले, अॅक्टीव्ह रुग्णांना सौम्य प्रकारची लक्षणे आहेत. सर्वच रुग्ण घरी उपचाराखाली आहेत. यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. लक्षणे दिसताच मनपाच्या ‘युपीएचसी’मधून नि:शुल्क तपासणी करून उपचार घ्यावेत.
घाबरू नका, काळजी घ्या
‘जेएन.१’चा रुग्णांची संख्या व लक्षणे पाहता घाबरुन जाण्याची गरज नाही. जे रुग्ण ‘अॅक्टीव्ह’ आहेत त्यांना सौम्य प्रकारची लक्षणे आहेत. परंतु खबरदारी म्हणून गर्दीचे ठिकाण टाळायला हवे. गर्दीत जाणे गरजेचे असल्यास मास्कचा वापर करायला हवा. विशेषत: वृद्धांनी कोरोनाचा नियमाचे पालन करायला हवे. वारंवार हात धुणे, डोळ्याला, नाकाला हात न लावणे, अंतर ठेवणे, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवश्यक पावले उचलणे गरजेचे आहे. -डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक