वैदर्भीयांचा अमेरिकेत ‘कोरोनासंहारक गणपती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 04:01 PM2020-08-29T16:01:59+5:302020-08-29T16:03:02+5:30

अमेरिकेत यंदा मराठी बांधवांकडून श्रीगणेशोत्सव साजरा केला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मंडळींनी यंदा तेथे ‘कोरोनासंहारक गणपती’ची स्थापना केली आहे.

'Corona-killing Ganpati' in America by Vaidarbhis | वैदर्भीयांचा अमेरिकेत ‘कोरोनासंहारक गणपती’

वैदर्भीयांचा अमेरिकेत ‘कोरोनासंहारक गणपती’

googlenewsNext
ठळक मुद्देकाटेकोर नियमांसह राबविले जात आहेत विविध उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय आणि महाराष्ट्रातील नागरिक जगात जिथे-कुठे नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायिक झाले तेथे त्यांनी आपल्याकडील संस्कृती, सोपस्कारही नेले. याचे सगळ्यात मोठे उदाहरण जर देता येईल तर ते श्रीगणेशोत्सवाचे. याच कारणाने जगभरात गणेशोत्सवाची धूम असते. अमेरिकेतही यंदा मराठी बांधवांकडून श्रीगणेशोत्सव साजरा केला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मंडळींनी यंदा तेथे ‘कोरोनासंहारक गणपती’ची स्थापना केली आहे.

वैदर्भीय असलेल्या अनुप्रिया केंद्रे-कायंदे यांनी सांगितले, अमेरिकेत मोठ्या संख्येने मराठी समाज स्थायिक झालेला आहे. तेथील वेगवेगळ्या शहरात मराठी लोक जवळपास सगळेच सण मिळून-मिसळून करत असतात. येथीलच कनेक्टिकट येथील ‘देसीज अराऊण्ड रॉकी हिल’ या भारतीयांच्या समूहामार्फत २०१८ पासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात आहे. अमेरिकेत असूनही अगदी पारंपारिक पद्धतीने ढोल, ताशे, लेझीमच्या गजरात येथे गणरायाचे स्वागत केले जाते आणि अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव विधिवत साजरा केला जातो.

हे वर्ष कोरोनाने ग्रासले आहे. जगभरात या सूक्ष्म विषाणूचे थैमान आहे. या विषाणूच्या संसर्गाने सर्वत्र अजूनही धास्तीचेच वातावरण आहे. तरीदेखील गणेशभक्तांचा उत्साह कायम आहे. अमेरिकेतील हे मंडळही या उत्साहाला अपवाद नाही. न्यूइंगटन येथील वल्लभधाम मंदिराचे विश्वस्त राजीव देसाई यांच्या सहकार्यातून व मंडळाचे उपाध्यक्ष उपेंद्र अविनाश वाटवे यांच्या संकल्पनेतून यंदा ‘कोरोनासंहारक गणपती’ येथे बसवण्यात आला आहे. वाटवे यांनीच ही मूर्ती साकारली. हेमंत कडेगावकर यांनी रंगछटा दिली आणि कीर्ती व अमोल मोरे या दाम्पत्याने सजावट केली. स्थापना सोहळ्याचे यजमान विनय पाडोळे होते तर पौरोहित्य दुर्गेश जोशी यांनी केले.

गणेशभक्तांचा उत्साह कायम ठेवण्यासाठी कार्यकर्ते गौतम नाईक, अभिजित वग्गा, दीपा कृष्णमूर्ती, वेदा कडेगावकर यांनी ऑनलाईन निबंध स्पर्धा, गणपती सजावट स्पर्धा, गणपती कला प्रदर्शन, अथर्वशीर्ष पठण आदी उपक्रम राबविले आहेत. विशेष म्हणजे ही सर्व मंडळी महाराष्ट्रासह विदर्भातील आहेत.

 

Web Title: 'Corona-killing Ganpati' in America by Vaidarbhis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.