ऐन अभ्यासाच्या वयात कोरोनाने त्यांना केले पोरके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:07 AM2021-06-04T04:07:12+5:302021-06-04T04:07:12+5:30
मनोज झाडे वानाडोंगरी : कोरोनाच्या व्यथा मन हेलावून सोडणाऱ्या आहे. एका सुखवस्तू कुटुंबाला कोरोनाने विळखा घातला. एक एक ...
मनोज झाडे
वानाडोंगरी : कोरोनाच्या व्यथा मन हेलावून सोडणाऱ्या आहे. एका सुखवस्तू कुटुंबाला कोरोनाने विळखा घातला. एक एक करता घरातील आई-वडिलांना कोरोनाने हिरावून नेले. हिंगण्या तालुक्यात चार सदस्यांच्या घरात दोन मुलांना कोरोनाने पोरके केले. ऐन अभ्यासाच्या वयात कोरोनाने वेदनेची मोठी जखम दिली आहे.
हिंगणा तालुक्यातील सातगाव येथील एक शिक्षक व त्यांच्या पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ५१ वर्षीय वडीलांचा २० एप्रिल २०२१ रोजी कोरोनाने मृत्यू झाला. तर अवघ्या ११ दिवसांनी म्हणजे १ मे २०२१ रोजी पत्नीनेदेखील अखेरचा श्वास घेतला. दोन्ही बहीण भावंडांवर दु:खाचा डोंगरच कोसळला. ज्या आईवडीलांनी जगात आणले, वाढविले, संस्कार केले ते अचानक गेल्यामुळे दोघांनाही मोठा धक्का बसला. आई-वडिलांच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेने तालुक्यात सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या या भावंडांचा सांभाळ त्याचे काका करीत आहेत. त्या कुटुंबाकडे वडिलांच्या नोकरी शिवाय कुठलेही आर्थिक स्रोत नव्हता आणि आता तर फक्त वडिलांची पेन्शन हाच आधार आहे. तीदेखील अजूनपर्यंत सुरू झालेले नाही. शासनाकडे कोरोना विम्यासाठी अर्ज केला आहे. मात्र त्याचेही काय होणार हाच प्रश्न या कुटुंबापुढे आहे.
- मुलांनी दुखातही स्वत:ला सावरले
लोकमत प्रतिनिधीने संबंधित कुटुंबीयांची भेट घेतली. १९ वर्षांची मुलगी व ११ वर्षांचा मुलगा यांनी वेदना मांडली. नियतीपुढे दोन्ही भावंड हतबल होते, पण त्यांनी धीर सोडला नाही. मुलीला डॉक्टर, तर मुलाला संशोधक व्हायचेय, असे दोघांनी बोलून दाखविले. या भावंडांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासन प्रशासनाने त्यांच्या वडिलांची सर्व देयके निकाली काढण्याची गरज आहे.