कोरोनामुळे विद्यापीठाचे पेपर सेटर, मॉडरेटर चक्रावले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:09 AM2021-04-21T04:09:28+5:302021-04-21T04:09:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या तिसऱ्या सत्रातील आवश्यक मराठीचा पेपर २० ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या तिसऱ्या सत्रातील आवश्यक मराठीचा पेपर २० एप्रिल रोजी झाला. या पेपरमध्ये दहाच्या वर प्रश्न आवश्यक मराठी वगळता इतिहासावरील विचारण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. ९ एप्रिल रोजी झालेल्या मराठी साहित्याच्या पेपरमध्येही असाच घोळ झाला होता. त्या पेपरमध्ये बरीच प्रश्न आऊट ऑफ सिलॅबस होती, शिवाय अन्य पेपरमध्येही असाच घोळ झाल्याचे चर्चेत आहे. त्यामुळे अभ्यास मंडळ, परीक्षा मंडळ, पेपर सेटर, मॉडरेटर कोरोनामुळे चक्रावले तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित व्हायला लागला आहे.
मंगळवारी झालेल्या आवश्यक मराठीच्या तिसऱ्या सत्रातील पेपरसाठी गद्यचे पाच, पद्यचे पाच आणि व्यावहारिक मराठीची दोन प्रकरणे घेतली गेली आहेत. त्याअनुषंगाने पेपरमध्ये प्रश्न उतरायला हवी होती. मात्र, त्याउलट दुसऱ्याच विषयाची प्रश्न विचारली गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अभ्यास मंडळ, परीक्षा विभाग, पेपरसेटर, मॉडरेटर यांचे ताळमेळ कुठे चुकत आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. ही तांत्रिक चूक आहे की प्रश्नांची अदलाबदली, हाही प्रश्न उपस्थित होत आहे.
-----------
परीक्षेत विचारली जाणारी प्रश्ने त्या विषयाचे प्राध्यापकच काढत असतात. त्यामुळे मराठीत इतिहासाचे प्रश्न विचारले जाणे शक्य नाही. असे झाले असेल, तर ही तांत्रिक चूक असू शकते. कोरोनामुळे सध्या ऑनलाईन परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे प्रश्नांची अदलाबदल झाली असू शकते. या प्रकरणाचा तपास करून, तथ्य आढळल्यास निर्णय घेऊ.
- डॉ. संजय दुधे, प्र-कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
--------------
विद्यार्थ्यांची तक्रार असेल, तर या प्रकरणाची शहानिशा करू आणि बोर्ड ऑफ स्टडीजपुढे विषय ठेवू. तथ्य असल्याचे स्पष्ट झाले की योग्य तो निर्णय घेतला जाईल.
- डॉ. प्रफुल्ल साबळे, संचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ