नागपूर आकाशवाणीला कोरोनाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:08 AM2021-04-01T04:08:41+5:302021-04-01T04:08:41+5:30
- अनेक जण क्वारंटाइन, ऑफिस स्टाफची भेडसावते आहे उणीव लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरात कोरोना संक्रमणाचा वेग अतिशय ...
- अनेक जण क्वारंटाइन, ऑफिस स्टाफची भेडसावते आहे उणीव
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात कोरोना संक्रमणाचा वेग अतिशय वाढला आहे. अनेक शासकीय, निमशासकीय व खासगी संस्थांमध्ये कर्मचारी संक्रमणाने ग्रासले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नागपूर आकाशवाणीलाही कोरोना संक्रमणाचा विळखा बसला आहे. बहुतांश कर्मचारी होम क्वारंटाइन आहेत, तर काही जण इस्पितळांमध्ये उपचार घेत असल्याने, आकाशवाणीतील विविध विभागांत स्टाफची उणीव निर्माण झाली आहे.
लसीकरणास सुरुवात झाली आणि कोरोना आता हद्दपार होणार, अशी भावना व्यक्त केली जात असतानाच, नागपुरात तुफान वेगाने कोरोनाने पुन्हा एकदा उचल मारली आहे. साडेतीन-चार हजार संक्रमितांचे आकडे दररोज येत आहेत. सोबतच संक्रमितांच्या मृत्यूचे आकडेही दररोज वाढतीवरच आहेत. त्याच श्रृंखलेत १७ मार्च रोजी नागपूर आकाशवाणीचे अ श्रेणीचे सुप्रसिद्ध सतार वादक उस्ताद नासीर खान यांचे कोरोना संक्रमणाने निधन झाले. दहा दिवस उलटत नाही, तोच त्यांच्या पत्नी यांचेही संक्रमणाने निधन झाले. यासोबतच आकाशवाणीतील अनेक कर्मचाऱ्यांना संक्रमणाने ग्रासले आहे. शासकीय नियमानुसार कोरोना काळात कर्मचाऱ्यांची उपस्थिती आलटून पालटून करण्यात आली आहे. मात्र, बहुतांश कर्मचाऱ्यांना संक्रमणाने ग्रासल्याने आकाशवाणीचे विविध विभाग संकटात सापडले आहेत. शासकीय संस्थेत इतक्या वेगाने संक्रमण कसे पसरले, ही चिंता बड्या अधिकाऱ्यांना लागली आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या घरातील लोक संक्रमित असल्याने, त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन केले आहे. कोरोना नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचाच हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे.
-----------
अनेक जण सुट्टीवर
शासनाच्या निर्देशानुसार कोरोना बाबतीतील सर्व नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. ऑफिस स्टाफ आलटून पालटून बोलाविण्यात येत असतानाच संक्रमणामुळे अनेक जण सुट्टीवर गेले आहेत. मुखाच्छादनाशिवाय परिसरात प्रवेश दिला जात नाही. अगदी सुरक्षा केबिनपासून ते प्रत्येक विभागात निर्जंतुकीकरणाची व्यवस्था आहे. प्रत्येकाची थर्मल स्कॅनिंग केली जात आहे.
- कार्यालय अध्यक्ष, आकाशवाणी, नागपूर
.................