नागपुरात सप्टेंबरमध्ये कोरोना झाला भयंकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 07:00 AM2020-09-08T07:00:00+5:302020-09-08T07:00:02+5:30
सात दिवसात ४९,१७४ नमुन्यांच्या तपासणीत ११,४७७ नमुने पॉझिटिव्ह आले आहे. अर्थात, तपासण्यात आलेल्या नमुन्यांमधील २३.३३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आहेत तर याच काळात ३२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीवरूनच कोरोना संक्रमणाने उग्र रूप धारण केल्याचा अंदाज घेता येतो.
राजीव सिंह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात कोरोना संक्रमण बेलगाम झाले आहे. सात दिवसात ४९,१७४ नमुन्यांच्या तपासणीत ११,४७७ नमुने पॉझिटिव्ह आले आहे. अर्थात, तपासण्यात आलेल्या नमुन्यांमधील २३.३३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आहेत तर याच काळात ३२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीवरूनच कोरोना संक्रमणाने उग्र रूप धारण केल्याचा अंदाज घेता येतो.
नागपुरात ११ मार्च रोजी कोरोना संसर्गाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर हळूहळू संसर्गाने पाय पसरण्यास सुरुवात केली. मार्च ते जून महिन्यात एकूण २४,५०० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील १,५०३ रुग्ण पाझिटिव्ह होते. परंतु, सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात त्या साडेतीन महिन्याच्या तुलनेत दुप्पट नमुन्यांची तपासणी करण्यात आली. मात्र, संक्रमित रुग्णांचा आकडा सात पटींनी वाढलेला दिसून आला. ७ सप्टेंबरपर्यंत नागपूर जिल्ह्यात एकूण ४१,०३२ रुग्णांची नोंद झाली आहे तर १,३६५ रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण ३ लाख ४ हजार ९१ नमुने तपासण्यात आले आणि एकूण २८,६५८ रुग्ण बरे झाले आहेत.
मृत्यूदर २.७८ टक्के
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सात दिवसात ३२० संक्रमितांचा मृत्यू झाला. ६ सप्टेंबरला सर्वाधिक ५४ संक्रमितांनी प्राण सोडले तर ७ सप्टेंबरला ५० संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. सात दिवसात मिळालेल्या पॉजिटिव्ह रुग्ण आणि मृत्यूच्या आकड्यांचा विचार केला तर मृत्यूदर २.७८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. जून महिन्यापर्यंत हा दर १ टक्क्यापेक्षाही कमी होता.