कोरोना निगेटिव्ह आणि मन पॉझिटिव्ह असणे गरजेचे: सरसंघचालक मोहन भागवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 11:29 PM2021-05-15T23:29:50+5:302021-05-15T23:31:00+5:30
Mohan Bhagwat, Corona कोरोना संक्रमणाविरुद्ध लढा देऊन देश विजय प्राप्त करेल, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केला. देशाने यापूर्वीही अनेक संकटांचा सामना केला आहे. प्रत्येक संकटात आपण थांबलो नाही. दृढ संकल्पशक्तीच्या भरवशावर कोविड विरोधातील लढ्यात आपल्याला यश मिळेल. त्यासाठी या काळात कोरोना निगेटिव्ह असणे आणि मन पॉझिटिव्ह ठेवण्याचे आवाहन भागवत यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाविरुद्ध लढा देऊन देश विजय प्राप्त करेल, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केला. देशाने यापूर्वीही अनेक संकटांचा सामना केला आहे. प्रत्येक संकटात आपण थांबलो नाही. दृढ संकल्पशक्तीच्या भरवशावर कोविड विरोधातील लढ्यात आपल्याला यश मिळेल. त्यासाठी या काळात कोरोना निगेटिव्ह असणे आणि मन पॉझिटिव्ह ठेवण्याचे आवाहन भागवत यांनी केले.
भागवत शनिवारी संध्याकाळी दिल्ली येथील कोविड रिस्पॉन्स टीमच्या वतीने आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेत बोलत होते. कोरोनाने संपूर्ण मानवजातीपुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे. परिस्थिती चिंताजनक आणि निराशावादी बनली आहे. संघाचे प्रथम सरसंघचालक डॉ. हेडगेवार किशोरावस्थेत असताना देशात प्लेगने थैमान घातला होता; मात्र तेव्हाही ते समाजसेवा करत राहिले. दु:ख दूर करून समाजाशी आत्मिय संबंध जोडण्यावर त्यांनी भर दिला. वर्तमान स्थितीत कोरोनाच्या काळातही आपल्याला एक टीम म्हणून संघर्ष करावा लागणार आहे. संकटाच्या या काळातही संधी शोधून पुढे चालावे लागणार आहे. चिंतेच्या या काळात वेळेचा सदुपयोग करून कुटुंबातील संवाद वाढविण्यावर भर देणे गरजेचे आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी समाजाकडूनच प्रयत्न करावे लागणार आहे. भविष्यवेधी आर्थिक त्रासदीचा विचार करून आजपासूनच ते टाळण्याचे प्रयत्न सुरू करण्याचे आवाहन भागवत यांनी यावेळी केले.