छिंदवाड्याला जाण्यासाठी कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:08 AM2021-02-26T04:08:13+5:302021-02-26T04:08:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्र व विशेषत: नागपुरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे लगतच्या जिल्ह्यांनीही खबरदारी घेतली आहे. छिंदवाडा प्रशासनाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र व विशेषत: नागपुरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे लगतच्या जिल्ह्यांनीही खबरदारी घेतली आहे. छिंदवाडा प्रशासनाने तर महाराष्ट्रातून छिंदवाडा जिल्ह्यात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक केला आहे. कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट सादर केला तरच प्रवेश दिला जाईल असे आदेशच जारी केले आहे.
मागील काही दिवसात नागपुरात काेरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. नागपूर जिल्हा प्रशासन सुद्धा आावश्यक खबरदारी व प्रतिबंधात्मक निर्णय घेत आहे. आता लगतच्या जिल्ह्यांनीही याची धास्ती घेतली आहे. नागपूरला लागूनच मध्यप्रदेश राज्य असून छिंदवाडा जिल्हा लागून आहे. नागपुरातून मोठ्या प्रमाणावर लोक छिंदवाड्यात ये जा करीत असतात. महादेव मेळा, नागदेव मेळासाठीही येथून मोठ्या प्रमाणावर लोक तिथे जातात. या पार्श्वभूमीवर छिंदवाडा जिल्हा प्रशासनाने एक आदेश जारी केले आहेत. महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोनामुळेच मध्यप्रदेशात कोरोनाचा प्रसार होऊ नये,यासाठी हे आदेश जारी केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यातून छिंदवाडा जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना चेकपोस्टवर थर्मल स्कॅनिंगद्वारे तपासणी करणे आवश्यक राहील. तसेच संबंधित व्यक्तीने कोविड-१९ चा निगेटिव्ह रिपोर्ट सादर केल्यावरच त्याला प्रवेश दिला जाईल. छिंदवाड्याचे जिल्हाधिकारी साैरभ कुमार सुमन यांनी हे आदेश जारी केले आहेत.