नागपुरात २८ नमुन्यातही कोणी कोरोना बाधित नाही : अमरावतीमधून आले २१ नमुने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 11:31 PM2020-03-19T23:31:02+5:302020-03-19T23:32:17+5:30
विदर्भात कोरोना प्रादुर्भावावर प्रशासनाच्या व नागरिकांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे काही प्रमाणात आळा बसल्याचे दिसून येत आहे. सलग पाचव्या दिवशी २८ नमुने निगेटिव्ह आलेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात कोरोना प्रादुर्भावावर प्रशासनाच्या व नागरिकांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे काही प्रमाणात आळा बसल्याचे दिसून येत आहे. सलग पाचव्या दिवशी २८ नमुने निगेटिव्ह आलेत. विशेष म्हणजे, यात अमरावती जिल्ह्यातून २१ नमुन्यांचा समावेश होता. गुरुवारी मेयो व मेडिकलमध्ये पुन्हा पाच संशयित रुग्ण दाखल झाले. यांचा अहवाल रात्री उशिरा येण्याची शक्यता आहे.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत (व्हीआरडीएल) छत्तीसगड, मध्य प्रदेशासह विदर्भातून आलेले आतापर्यंत १४४ नमुने तपासण्यात आले. यात केवळ चारच नमुने पॉझिटिव्ह आले. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या स्थिर असली तरी आरोग्य यंत्रणेने सुचविलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. एक चूक सर्वांना महागात पडेल, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.
निगेटिव्ह आलेल्या रुग्णांना पाठविले घरी
गुरुवारी पहिल्या टप्प्यात ३० नमुने तपासण्यात आले. यात अमरावतीचे २१, बुलडाण्यातील एक, अकोल्यातील एक, मेयोमधील एक तर मेडिकलमधील दोन रुग्णांचा समावेश आहे. यातील २८ नमुन्यांचा अहवाल सायंकाळी प्राप्त झाला. त्यानुसार मेयोमध्ये भरती झालेल्या १० तर मेडिकलमधील पाच रुग्णांना घरी पाठविण्यात आले.
मेयो, मेडिकलमध्ये पाच संशयित दाखल
मेडिकलमध्ये दाखल झालेल्या तीन संशयित रुग्णांमध्ये एक ३७ वर्षीय पुरुष रुग्ण आहे. तो पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने व लक्षणे दिसून आल्याने भरती करण्यात आले. तर दुसरा २४ वर्षीय पुरुष रुग्ण आहे. काही दिवसांपूर्वी जर्मनी येथून तो नागपुरात आला. सर्दी, खोकला व तापाची लक्षणे आढळल्याने मेडिकलमध्ये दाखल केले. तिसऱ्या रुग्णाची माहिती अद्यापही मिळली नाही. मेयोमध्ये रात्री ९ वाजेपर्यंत दोन रुग्ण भरती होते.
पॉझिटिव्ह रुग्णाचा दोन्ही चाचण्या निगेटिव्ह
मेयोमध्ये एक तर मेडिकलमध्ये तीन कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मेयोमधील पॉझिटिव्ह रुग्णाची आतापर्यंत दोनदा चाचणी करण्यात आली. या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. परंतु त्यानंतरही भरती झाल्यापासून १४ दिवस त्यांना रुग्णालयातच राहावे लागणार आहे. तर मेडिकलमध्ये भरती असलेल्या तीनही पॉझिटिव्ह रुग्णांचा १४ दिवसांचा कालावधी संपल्यानंतर २४ तासांच्या अंतराने त्यांच्या चाचण्या केल्या जातील. या चाचण्या निगेटिव्ह आल्यावरच त्यांना घरी पाठविण्यात येईल.
श्रीलंकेतील प्रवासी महिलेचे नमुने तपासणीसाठी
श्रीलंकेतून भारत दर्शनासाठी आलेल्या ७४ वर्षीय महिलेचा बुधवारी मृत्यू झाला. त्यांच्या प्रवासाची पार्श्वभूमी असल्याने कोरोना संशयित रुग्ण म्हणून त्यांची नोंद झाली आहे. गुरुवारी त्यांचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून रात्री उशिरा अहवाल येण्याची शक्यता आहे.
व्हेंटिलेटरवरील डॉक्टरही निगेटिव्ह
मेडिकलमध्ये कार्यरत ३४ वर्षीय डॉक्टर कोरोना संशयित रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. नमुने तपासण्यात आले असता अहवाल निगेटिव्ह आला. परंतु बुधवारी अचानक श्वास घेण्यास कठीण झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. यामुळे आज पुन्हा नमुने तपासण्यात आले असता निगेटिव्ह आले.