कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना मिळणार ‘सोबत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:09 AM2021-05-26T04:09:23+5:302021-05-26T04:09:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या लाटेमध्ये अनेकांचा मृत्यू झाला असून त्यांच्या मुलांवरील छत्र हरविले आहे. ज्या मुलांचे आई-वडील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या लाटेमध्ये अनेकांचा मृत्यू झाला असून त्यांच्या मुलांवरील छत्र हरविले आहे. ज्या मुलांचे आई-वडील किंवा दोघांपैकी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असेल, त्यांचे पालकत्व घेण्यासाठी श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. शून्य ते वीस वयोगटातील या मुलांना आधार देण्यासाठी ‘सोबत’ हा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष व माजी महापौर संदीप जोशी यांनी दिली आहे.
कोरोनामुळे अनेक कुटुंबांवर आघात झाला आहे. घरातील कर्ता पुरुष किंवा महिला गेल्याने त्यांच्या मुलांचे काय होणार, हा प्रश्न नातेवाईकांना पडला आहे. अशा मुलांना या प्रकल्पाच्या माध्यमातून आधार देण्यात येणार आहे. समाजातील दात्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प चालविण्यात येणार आहे. २७ मे रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. दोन्ही पालक किंवा एका पालकाचा मृत्यू झाला असल्यास संस्थेच्या दीक्षाभूमीजवळील राजेंद्र सिंह सायन्स एक्स्प्लोरेटरीच्या कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन जोशी यांनी केले.
पालकत्व स्वीकारताना काही अटींचे पालन करण्यात येईल. ज्यांचे पालक सरकारी सेवेत होते, ते या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत. तसेच ज्यांच्या पालकांचे निवृत्तीवेतन १५ हजार रुपयांहून जास्त आहे किंवा आजी-आजोबांचे निवृत्तीवेतन २५ हजारांहून जास्त आहे, तेदेखील योजनेसाठी पात्र राहणार नाहीत. या योजनेत प्रत्यक्ष पैशाची मदत करण्यात येणार नाही. मुलांचे शिक्षण, आहार, आरोग्य, कौशल्य प्रशिक्षण, समुपदेशन या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यात येतील, असेदेखील जोशी यांनी सांगितले.