नागपुरात कोरोनाची साथ कमी झाली, डेंग्यूची नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 09:52 AM2021-06-07T09:52:09+5:302021-06-07T09:52:49+5:30

Nagpur news नागपुरात कोरोनाची साथ कमी होत असताना डेंग्यूही नियंत्रणात असल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे.

Corona outbreak decreased in Nagpur, dengue under control | नागपुरात कोरोनाची साथ कमी झाली, डेंग्यूची नियंत्रणात

नागपुरात कोरोनाची साथ कमी झाली, डेंग्यूची नियंत्रणात

googlenewsNext

 

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : एक डास माणसांची किती दाणादाण उडवतो आणि व्यवस्था कोलमडून टाकतो, याचा अनुभव मागील आठ वर्षांपासून नागपूरकर अनुभवत आहेत. परंतु मागील वर्षी व या पाच महिन्यांच्या काळात पहिल्यांदाच डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. यामागे मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने केलेल्या उपाययोजना व कोरोनामुळे अनेकांनी घेतलेल्या खबरदारीमुळे हे शक्य झाले. कोरोनाची साथ कमी होत असताना डेंग्यूही नियंत्रणात असल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे.

नागपुरात पहिल्यांदाच २०१४ मध्ये डेंग्यूच्या रुग्णांत अचानक वाढ झाली. ६०१ रुग्णांची नोंद झाल्याने खळबळ उडाली. कमी मनुष्यबळ, अद्ययावत यंत्रसामग्रीचा अभाव यामुळे डेंग्यू नियंत्रणात येत नव्हता. यातच डेंग्यू डासांचा समूळ नाश करण्याची जबाबदारी सर्वांची असताना नागरिकांचा सहभाग अल्प होता. परिणामी, २०१५ मध्ये २३० रुग्ण, २०१६ मध्ये १९५ रुग्ण व एक मृत्यू, २०१७ मध्ये १९९ रुग्ण, २०१८ मध्ये ५६५ रुग्ण, २०१९ मध्ये ६२७ रुग्ण व एक मृत्यू, २०२० मध्ये १०७ रुग्ण व एक मृत्यू तर जानेवारी ते मे २०२१ या दरम्यान १२ रुग्णांची नोंद झाली आहे.

-ही घ्या काळजी

डेंग्यूमध्ये एकदम जोराचा ताप चढणे, डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे, डोळ्यांच्या मागील भागात वेदना जी डोळ्यांच्या हालचालीसोबत अधिक होते, स्नायू आणि सांध्यांमध्ये वेदना, चव आणि भूक नष्ट होणे, छाती आणि वरील अवयवांवर गोवरासारखे पुरळ येणे, मळमळणे आणि उलट्या होणे व त्वचेवर व्रण उठणे आदी लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या. परंतु डेंग्यू होऊच नये यासाठी कूलर, फुलदाणीतील पाणी तीन ते चार दिवसांत बदलावे. घरांमध्ये कीटकनाशक फवारणी करावी. शौचालयाचे गॅस पाइप बारीक जाळीच्या कपड्याने झाकून ठेवावे. वाहनांचे जुने टायर नष्ट करावे. छतावरील पाण्याची टाकी झाकून ठेवावी. आठवड्यातून एक कोरडा दिवस म्हणून पाळावा. विहिरीत किंवा पाण्याच्या टाक्यांमध्ये गप्पी मासे सोडावे. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा व संपूर्ण अंग झाकेल अशा कपड्यांचा वापर करावा.

-आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा

डेंग्यूला कारणीभूत असलेले एडीस डास हे जास्त करून शहरी वस्त्यांत आढळतात. या डासांवर पांढरे पट्टे असल्यामुळे ओळखायला सोपे जाते. रिकामे डबे, मडकी, चाकांचे टायर्स इत्यादींमध्ये साचलेल्या पाण्यात हे डास लवकर फैलावतात. यामुळे यातले पाणी दर आठवड्याला काढून त्यांचा तळ ब्रशने घासावा, तरच चिकटलेली अंडी निघतात. डेंग्यूवर उपचार नाही, दिसून आलेल्या लक्षणांवर उपचार केला जातो. यामुळे या डासाची उत्पत्तीच होणार नाही यासाठी प्रत्येक नागरिकांनी याला गंभीरतेने घेणे आवश्यक आहे.

- दीपाली नासरे,

हिवताप व हत्तीरोग विभाग, मनपा

 

वर्ष :रुग्ण :मृत्यू

२०१६ :१९५ :०१

२०१७ :१९९: ००

२०१८ :५६५ :००

२०१९: ६२७: ०१

२०२० :१०७ :०१

२०२१ : १२ :००

(मेपर्यंत)

Web Title: Corona outbreak decreased in Nagpur, dengue under control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.