कोरोना प्रादुर्भावामुळे अनेकांची मोलकरणींना ‘नो एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:07 AM2021-04-14T04:07:43+5:302021-04-14T04:07:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणाचा प्रवेश होताच गेल्या मार्च २०२० पासूनच घरोघरी काम करणाऱ्या मोलकरणींना अनेक कुटुंबीयांनी ...

Corona outbreak leaves many maids 'no entry' | कोरोना प्रादुर्भावामुळे अनेकांची मोलकरणींना ‘नो एन्ट्री’

कोरोना प्रादुर्भावामुळे अनेकांची मोलकरणींना ‘नो एन्ट्री’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमणाचा प्रवेश होताच गेल्या मार्च २०२० पासूनच घरोघरी काम करणाऱ्या मोलकरणींना अनेक कुटुंबीयांनी गृहप्रवेश नाकारला होता. टाळेबंदीपर्यंत मोलकरणींना कामावर न येऊ देण्याचा, मात्र पगार पूर्ण देण्याचा तसा आदेशच होता. तेव्हा काही कुटुंबीयांनी या आदेशाचे तंतोतंत पालन केले. याचे पर्यवसान म्हणून, नंतर अनेक कुटुंबीयांनी दोन-तीन महिन्यानंतर मोलकरणींची हकालपट्टीच केली. त्याचा फटका एकहाती कुटुंब सांभाळणाऱ्या महिलांच्या आयुष्यावर झाला. अनेक मोलकरणींची आर्थिक स्थिती ढासळली. स्थिती पूर्वपदावर येत असतानाच फेब्रुवारी २०२१ पासून पुन्हा कोरोना संक्रमणाचा प्रकोप वाढला आणि स्थिती बिकट बनली. त्यात आता पुन्हा टाळेबंदीची घोषणा या महिलांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरत आहे. काम नसेल तर पैसा मिळणार नाही आणि पैसा नसेल तर घराचा गाडा हाकायचा कसा, हा प्रश्न त्यांना पडला आहे.

--------------

पॉईंटर्स

* २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या

शहर - २३,९८,०००

ग्रामीण - २३,८८,०००

* देशाच्या एकूण जनगणनेनुसार ३५ टक्के नागरिक असंघटित क्षेत्रात

* जिल्ह्यातील ३५ टक्के अर्थात १७ लाख नागरिक असंघटित क्षेत्रात

* त्यात ५० टक्के अर्थात ८.५ लाख महिलांचा समावेश

* २००८ मध्ये जिल्ह्यात मोलकरीण संघटनेकडे एक लाख नोंदी

----------------

मोलकरणींचे प्रकार...

* पूर्णवेळ (एकाच घरी दिवसाचे ८ तास) - पगार १२०० रुपये प्रतितास (महिनेवारी)

* अंशकालिन (एका दिवसाला सात-आठ घरे) - पगार ५०० ते ६०० रुपये (महिनेवारी)

--------------

मोलकरणींच्या कामाचे प्रकार

* साफसफाई करणारी

* धुणी-भांडी करणारी

* स्वयंपाकी

* बागकाम करणारी

* ज्येष्ठ किंवा एकटी वृद्ध महिला असणाऱ्या घरी रात्रीला सोबत म्हणून असणारी

------------------

टाळेबंदीमुळे मोलकरणींच्या व्यथा...

* जाटतरोडी येथून रामदास पेठेतील घरांमध्ये धुणी-भांडी करत असते. याच कामावर घरातील चार-पाच सदस्यांचा गाडा चालतो. रोज पायी जाते आणि सायंकाळी ५ वाजता स्वत:च्या घरी पोहोचते. टाळेबंदी, माझे काम बंद झाले तर जगण्याचा प्रश्न निर्माण होईल.

- कांता मडामे, मोलकरीण

* भामटी येथे राहते. तेथून त्रिमूर्तीनगर परिसरातील घरांमध्ये काम करण्यास जाते. टाळेबंदीची भीती दाखवली जात आहे. या काळात काम नसेल तर रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होईल.

- मंजुळा मेश्राम, मोलकरीण

* प्रतापनगर परिसरातील घरांमध्ये कामाला जाते. दररोज सात-आठ घरांमध्ये काम करते आणि कुटुंबाचा गाडा चालविते. टाळेबंदीची भीती सगळीकडून व्यक्त केली जात आहे. घरमालक आमचा विचार करतील, अशी अपेक्षा आहे.

- विजया मेश्राम, मोलकरीण

---------------

काम बंद करू नका, काळजी घ्या

गेल्या वर्षभरापासून अनेक घरांमध्ये मोलकरणींना प्रवेश बंदी आहे. त्यांना काम नसल्याने त्यांची स्थिती ढासळली आहे. नागरिकांनी त्यांची व्यथा समजून घ्यावी. काम बंद करण्यापेक्षा काळजी घ्या, सॅनिटायझरचा, हात धुऊनच प्रवेश, मास्क बंधनकारक करा. मोलकरीण जगवणे ही एक समाजसेवा आहे, हे विसरू नका.

- डॉ. रूपा कुळकर्णी-बोधी, समाजसेविका

..............

Web Title: Corona outbreak leaves many maids 'no entry'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.