कोरोना होऊन गेला; इतर आजारांवरील शस्त्रक्रिया करायची कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:10 AM2021-09-14T04:10:34+5:302021-09-14T04:10:34+5:30
नागपूर : कोरोना काळात मेयोमधील १०० टक्के तर मेडिकलमधील १५ ते २० टक्के शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ आली होती. ...
नागपूर : कोरोना काळात मेयोमधील १०० टक्के तर मेडिकलमधील १५ ते २० टक्के शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ आली होती. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच पुन्हा एकदा सर्वच शस्त्रक्रियांचा वेग वाढला आहे. विशेष म्हणजे, ‘इमर्जन्सी’ नसेल तर कोरोना झाल्यानंतर साधारण दीड महिन्यानंतर ‘प्लॅन सर्जरी’ कराव्या, असा सल्ला शल्यचिकित्सकांनी दिला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वत्र दहशतीचे वातावरण होते. बहुतांश शासकीयसह खासगी हॉस्पिटल कोविडच्या रुग्णांनी फुल्ल होते. यामुळे इतर आजाराच्या रुग्णांमधील केवळ इमर्जन्सी शस्त्रक्रिया झाल्या. ‘प्लॅन शस्त्रक्रिये’साठी रुग्णांना दोन महिन्यावर कालावधी दिला जात होता. परंतु यातही काही रुग्णांमध्ये गैरसमज होते. कुणी सहा तर कुणी आठ महिन्यापर्यंत शस्त्रक्रियेसाठी थांबावे लागणार का, असा प्रश्न डॉक्टरांना विचारत होते. परंतु आता कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने व कोरोना होऊन दीड ते दोन महिन्याचा कालावधी झालेल्यांच्या शस्त्रक्रिया प्लॅन करणे सुरू झाले आहे.
- शस्त्रक्रियेसाठी दीड ते दोन महिने वाट पाहा
कोरोनातून बरे झाले असले तरी ‘पोस्ट कोविड’ची लक्षणे काही रुग्णांमध्ये दिसून येतात. यामुळे साधारण दीड ते दोन महिन्यानंतरच शस्त्रक्रिया करणे योग्य राहते. यात डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो. काही महत्त्वाच्या चाचण्या केल्यावरच यावर निर्णय घेतला जाऊ शकतो, असे शल्यचिकित्सकांचे मत आहे.
- इमर्जन्सी शस्त्रक्रिया
पोटातील अल्सर किंवा अपेन्डिक्स किंवा जीव वाचविण्यासाठी शस्त्रक्रियेची गरज असलेल्या कोरोनाबाधित किंवा नुकताच कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांसाठी इमर्जन्सी शस्त्रक्रिया करण्याची गरज पडते. अशा रुग्णांसाठी मेडिकलमध्ये स्वतंत्र शस्त्रक्रियागृह आहेत.
- प्लॅन शस्त्रक्रिया
कोरोना होऊन दीड ते दोन महिन्याचा कालावधी झालेल्या रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन प्लॅन शस्त्रक्रिया केल्यास त्याचा फायदा होतो. अलीकडे या शस्त्रक्रिया वाढल्या आहेत. अनेक खासगी डॉक्टरांकडे पुढील दोन महिने प्लॅन शस्त्रक्रियांनी फुल्ल आहेत.
-कोट...
कोरोनामुळे रुग्णाच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होते. यामुळे कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच प्लॅन शस्त्रक्रिया करावी. कोरोना होऊन साधारण दीड ते दोन महिन्यांनी शस्त्रक्रिया करता येते. सध्या मेडिकलमध्ये रोज १० ते १२ प्लॅन शस्त्रक्रिया होत आहेत.
- डॉ. राज गजभिये, प्रमुख, शल्यचिकित्सा विभाग, मेडिकल