coronavirus; विदर्भात रुग्ण आणि मृत्यूचा उच्चांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 10:35 AM2020-07-28T10:35:05+5:302020-07-28T10:37:33+5:30
नागपूरसह यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यातही सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. एकूण रुग्णसंख्या १२,५६३ झाली असून १६ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ३३१ वर पोहचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भासाठी सोमवारचा दिवस कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा विक्रमी दिवस ठरला. पहिल्यांदाच एकाच दिवशी ४९५ नव्या रुग्णांची नोंद झाली. शिवाय, नागपूरसह यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यातही सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. एकूण रुग्णसंख्या १२,५६३ झाली असून १६ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ३३१ वर पोहचली आहे.
नागपूर जिल्ह्यात सोमवारी २७४ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. यात दहा रुग्णांच्या मृत्यूची भर पडली. मृतांची संख्या ९३ झाली. नागपूरची एकूण रुग्णसंख्या ४३३६ झाली आहे. नागपूरनंतर सर्वाधिक रुग्ण यवतमाळ जिल्ह्यात आढळून आले. ६८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. आतापर्यंतची ही सर्वाधिक वाढ आहे. रुग्णांची संख्या ८१२ झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातही ६१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या १,०६० झाली असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अकोला जिल्ह्यात रुग्णांची संख्या २,४३८ झाली आहे. एका रुग्णाच्या मृत्यूने मृतांची संख्या १०२ झाली आहे. वर्धा जिल्ह्यातही १२ रुग्ण पॉझिटिव्ह आले, रुग्णसंख्या १८१ झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात सात रुग्ण पॉझिटिव्ह आले. येथील रुग्णसंख्या ५१८ वर गेली आहे.
अमरावतीत तिघांचा मृत्यू
अमरावती जिल्ह्यात सोमवारी ४२ कोरोनाग्रस्तांची नोंद झाल्याने संक्रमितांची संख्या १७७१ वर पोहोचली असून तिघांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ५३ झाली आहे. मुंबईहून परतलेले जिल्ह्यातील एका आमदाराचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. यापूर्वी एक विधानपरिषदेचे आमदार व एका माजी राज्यमंत्र्यांना कोरोनाची बाधा झाली होती.
चंद्रपूर जिल्ह्यात २३ नवे रुग्ण
जिल्ह्यात २३ नव्या रुग्णांची भर पडली असून बाधितांची संख्या ४२८ झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात सात रुग्ण पॉझिटिव्ह आले. गोंदिया जिल्ह्यात नऊ तर भंडारा जिल्ह्यात चार रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णसंख्या २३४ वर गेली आहे.