विदर्भात कोरोना रुग्णसंख्येत चढउतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:12 AM2021-09-07T04:12:31+5:302021-09-07T04:12:31+5:30
नागपूर : विदर्भातील अकराही जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली, तरी मागील तीन दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात रुग्णांत वाढ होत ...
नागपूर : विदर्भातील अकराही जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली, तरी मागील तीन दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात रुग्णांत वाढ होत आहे, तर इतर जिल्ह्यामध्ये दैनंदिन रुग्णसंख्येचा चढउतार दिसून येत आहे. मागील सहा दिवसांत विदर्भात २१७ रुग्णांची नोंद झाली. मृत्यूचे प्रमाण १.९० टक्क्यांवर स्थिर आहे.
कोरोनाचा ‘डेल्टा व्हेरियंट’ने विदर्भातील सर्वच जिल्हे प्रभावित झाले होते. सर्वाधिक रुग्ण व मृत्यूची नोंद नागपूर जिल्ह्यात झाली, परंतु जून महिन्यापासून कोरोनाचे संकट हळूहळू कमी होत गेले. मात्र, मागील सहा दिवसांतील अकराही जिल्ह्यातील दैनंदिन रुग्णसंख्येचा चढउतार दिलासादायक नसल्याचे दिसून येत आहे. विदर्भात १ सप्टेंबर रोजी ५८, २ सप्टेंबर रोजी ४४, ३ सप्टेंबर रोजी २३, ४ सप्टेंबर रोजी ४४, ५ सप्टेंबर रोजी २२ तर ६ सप्टेंबर रोजी २६ रुग्णांची नोंद झाली. या सहा दिवसांत कुठेही मृत्यूची नोंद नाही. १८२ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करण्याचे प्रमाण ९८ टक्के आहे.
- नागपूरनंतर बुलडाण्यात सर्वाधिक रुग्ण
सोमवार, ६ सप्टेंबर रोजी नागपूर जिल्ह्यात १२ रुग्णांची नोंद झाली. त्या खालोखाल बुलडाणा जिल्ह्यात ९ रुग्ण आढळून आले. चंद्रपूर जिल्ह्यात २, गडचिरोली, अकोला व वाशिम जिल्ह्यात प्रत्येकी १ रुग्ण तर भंडारा, वर्धा, गोंदिया, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. सोमवारी विदर्भात २६ रुग्णाची नोंद झाली. रुग्णाची एकूण संख्या ११ लाख १९ हजार ४४५ झाली असून, मृतांची संख्या २१ हजार ३६० वर स्थिर आहे.