नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या २०० च्या घरात; शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2022 10:19 PM2022-07-13T22:19:33+5:302022-07-13T22:19:57+5:30
Nagpur News एकीकडे पावसाने थैमान घातले असताना बुधवारी तब्बल १२१ दिवसांनंतर दैनंदिन रुग्णसंख्या दोनशेजवळ पोहचली.
नागपूर : एकीकडे पावसाने थैमान घातले असताना बुधवारी तब्बल १२१ दिवसांनंतर दैनंदिन रुग्णसंख्या दोनशेजवळ पोहचली. १९४ रुग्णांची नोंद झाल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली. रुग्णांची एकूण संख्या ५ लाख ८० हजार ४८४ झाली असून मृतांची संख्या १० हजार ३३९वर स्थिर आहे.
कोरोनाची तिसरी लाट जानेवारीत ओसरल्यानंतर १२ फेब्रुवारी रोजी ४५८ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर बुधवारी पहिल्यांदाच रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. मागील चोवीस तासांत २ हजार २६७ चाचण्या झाल्या. त्या तुलनेत ८.६ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात शहरातील १३२ तर, ग्रामीणमधील ६२ रुग्ण आहेत. आज शहरातील ६२, ग्रामीणमधील ५३ असे एकूण ११५ रुग्ण बरे झाले. याचे प्रमाण ९८.१४ टक्के आहे.
-कोरोनाचे ९४२ रुग्ण ॲक्टिव्ह
वाढत्या रुग्णसंख्येमुळे ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. सध्या ९४२ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. यातील ९१९ रुग्ण गृह विलगीकरणात तर २३ रुग्ण विविध रुग्णालयात भरती आहेत.
-पॉश वसाहतीत कोरोनाचे रुग्ण अधिक
प्राप्त माहितीनुसार, मनपाच्या लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली व आसीनगर झोनमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहे. या भागातील पॉश वसाहतींमध्ये रुग्णांची संख्या अधिक आहे.
-विद्यार्थ्यांमध्येही कोरोना
शाळेकरी विद्यार्थ्यांमध्येही आता कोरोना दिसून येत आहे. एका नामांकित शाळेमधील जवळपास सहा विद्यार्थ्यांना लागण झाल्याचे पुढे आले आहे. परंतु यातील कोणालाच रुग्णालयात भरती होण्याची गरज पडली नाही.