नागपुरात कोरोनाचा उच्चांक, ९७१ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 08:40 PM2022-01-10T20:40:30+5:302022-01-10T20:41:05+5:30
Nagpur News नागपूर जिल्ह्यात रविवारच्या तुलनेत सोमवारी कमी ९,८५२ चाचण्या झाल्या. यातील शहरात झालेल्या ८,७१७ चाचण्यांमधून पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण ९ टक्के तर, ग्रामीणमध्ये झालेल्या १,१३५ चाचण्यांमधून पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण १० टक्के होते.
नागपूर : कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या दररोज उच्चांक गाठताना दिसून येत आहे. सोमवारी ९७१ रुग्णांची नोंद झाली. यातील ७९२ रुग्ण शहरातील, ११७ रुग्ण ग्रामीण भागातील तर, ६२ रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. चाचण्यांच्या तुलनेत सोमवारी पॉझिटिव्हीटीचा दर वाढून ९.९ टक्क्यांवर पोहचला आहे. रुग्णांची एकूण संख्या ४,९८,५५९ झाली असून मृतांची संख्या १०,१२३ वर स्थिर आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लोटला ओमायक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट कारणीभूत ठरल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या लाटेची सर्वाेच्च स्थिती कधी असेल हे पाहावे लागणार आहे. ही स्थिती जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यात येण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवित आहे. नागपूर जिल्ह्यात रविवारच्या तुलनेत सोमवारी कमी ९,८५२ चाचण्या झाल्या. यातील शहरात झालेल्या ८,७१७ चाचण्यांमधून पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण ९ टक्के तर, ग्रामीणमध्ये झालेल्या १,१३५ चाचण्यांमधून पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण १० टक्के होते.
-४,१५८ कोरोनाचे सक्रिय रुग्ण
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना सक्रिय रुग्ण संख्येतही वाढ होत आहे. सोमवारी नागपूर जिल्ह्यात ४,१५८ कोरोनाचे सक्रिय रुग्ण होते. यातील ३,५५६ रुग्ण शहरातील, ५५० रुग्ण ग्रामीण भागातील तर, ५२ रुग्ण जिल्ह्याबाहेरील होते. यातील २,५७३ रुग्ण होम क्वारंटाईन असून उर्वरित रुग्ण विविध शासकीयसह खासगी रुग्णालयात व संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
- ५३ पैकी ५१ रुग्णांना ओमायक्रॉनची बाधा
‘राष्ट्रीय पर्यावरण इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट’ (नीरी) नागपूरमध्ये सोमवारपासून जिनोम सिक्वेंन्सिंगला सुरूवात झाली. त्यांनी तपासलेल्या ५३ नमुन्यांमध्ये ५१ रुग्णांना ‘ओमायक्रॉन’ची बाधा असल्याचे स्पष्ट झाले. या नमुन्यांची जिनाॅम सिक्वेंन्सिंग स्वत:च्या पातळीवर केल्याने शासकीय दरबारी याची नोंद झाली नाही. यातील बहुसंख्य नमुने हे मनपाच्या लक्ष्मीनगर झोनमधील असल्याचे सांगण्यात येते.