कोरोनामुळे ६२ टक्के वृद्धांचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:11 AM2021-06-16T04:11:07+5:302021-06-16T04:11:07+5:30

नागपूर : देशातील कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने भयानक वास्तव्य समोर आणले. समाजातील प्रत्येक घटक या महामारीमुळे अडचणीत आला. ...

Corona persecutes 62% of the elderly | कोरोनामुळे ६२ टक्के वृद्धांचा छळ

कोरोनामुळे ६२ टक्के वृद्धांचा छळ

Next

नागपूर : देशातील कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने भयानक वास्तव्य समोर आणले. समाजातील प्रत्येक घटक या महामारीमुळे अडचणीत आला. परंतु, सर्वाधिक फटका बसला तो वृद्धांना. कोरोनामुळे ६२ टक्के वृद्धांचा छळ झाला. त्यांच्यामध्ये भीती, चिंता आणि एकटेपणाची भावना वाढली. परावलंबनामुळे गैरवर्तवणूक वाढल्याचेही ‘हेल्पएज इंडिया’ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले.

कोरोनाकाळात अनेकांतील माणुसकीचा प्रत्यय आला, तर अनेकांनी माणुसकी सोडल्याचेही दिसून आले. झाड, दगड ते जनावरांपर्यंत पूजणारा देशात आपल्याच वृद्धांची काळजी घेत नसल्याचे वास्तव पुन्हा एकदा दिसून आले. कोरोनाने वृद्धांवर काय प्रभाव टाकला यासाठी ‘हेल्पएज इंडिया’ने पुढाकार घेत एका व्यावसायिक कंपनीकडून सर्वेक्षण करून घेतले. या कंपनीने दिल्ली, बंगलोर, हैदराबाद, कोलकाता व चेन्नई येथील ३५२६ वृद्धांशी चर्चा करून व प्रश्नोत्तराच्या माध्यमातून अहवाल सादर केला.

- कोरोनामुळे घरात सर्व सदस्य असताना वृद्धांशी बोलणे टाळले

सर्वेक्षणात ५८.६ टक्के वृद्ध हे कुटुंबातील सदस्य होते. कोरोना काळात घरात सर्व सदस्य उपस्थित असताना २०.५ टक्के वृद्धांना एकटेपणा वाटत होता. कोणी आपल्याशी बोलावे असे, ३७.५ टक्के वृद्धांना वाटत होते. १३.७ टक्के वृद्धांना आपण घरात कोंडून असल्याची भावना होती.

- ५० टक्के वृद्धांनी आरोग्याच्या पायाभूत सोयींची केली मागणी

२०.८ टक्के वृद्धांनी कोरोनामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांना व मित्रांना गमावल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले. त्यांना आयुष्य वाचविण्यााठी काय करता येईल, असा प्रश्न केल्यावर ५०.८ टक्के वृद्धांनी सांगितले की, आरोग्याचा चांगल्या पायाभूत सुविधा असायला हव्यात. ४४.४ टक्के वृद्धांनी लसीकरणाची योग्य सोय, तर ३८.७ टक्के वृद्धांनी वेळेवर औषधे, इंजेक्शन उपलब्ध होण्याचे मत मांडले.

-वृद्धांना सर्वाधिक चिंता होती रुग्णालयात भरती होण्याची

कोरोनामुळे बाधित झाल्यास रुग्णालयात भरती होण्याची ४२.१ टक्के वृद्धांना चिंता वाटत होती. ३४.२ टक्के वृद्धांना कोरोनामुळे वेगळे राहण्याची, तर, ११.५ टक्के वृद्धांना मृत्यूची भीती वाटत होती.

-५२.४ टक्के वृद्धांना सांधेदुखीचा त्रास

कोरोनामुळे घराबाहेर पडता न आल्याने ५२.४ टक्के वृद्धांना सांधेदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागले. ४४.९ टक्क्यांमध्ये चालण्याची समस्या निर्माण झाली. २४.४ टक्क्यामंध्ये दृष्टिदोष, तर १३.८ टक्क्यांमध्ये लक्षात न राहण्याची समस्या निर्माण झाल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले.

-७७.५ टक्के वृद्धांना कोरोनाचे नियम माहिती आहेत

७७.५ टक्के वृद्धांना कोरोनाचे नियम माहिती होते. ७८.७ टक्के वृद्ध लसीकरणाचे महत्त्व ओळखून होते. ६६.६ टक्के वृद्धांना लसीचा पहिला डोस मिळाला होता.

-वृद्धांची काळजी घेणाऱ्या व्यवस्थेची गरज

एकीकडे कोरोनामुळे उद्भवलेल्या आरोग्याच्या समस्यांना वृद्ध तोंड देत असताना कुटुंबातील सदस्यांकडून होणारा छळ व अत्याचारालाही त्यांना सामोरे जावे लागल्याचे हेल्पएज इंडियाच्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. वृद्धांची काळजी घेणारी व्यवस्था निर्माण करण्याची तातडीची गरज आहे.

-सुनील ठाकूर, वरिष्ठ व्यवस्थापक हेल्पएज इंडिया (विदर्भ)

Web Title: Corona persecutes 62% of the elderly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.