बुस्टर डोसनंतरही कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:08 AM2021-03-05T04:08:06+5:302021-03-05T04:08:06+5:30
नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा ‘बुस्टर’ डोस घेऊनही ४२ वर्षीय स्टफ नर्स पॉझिटिव्ह आल्याने नागपुरात खळबळ उडाली. ...
नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा ‘बुस्टर’ डोस घेऊनही ४२ वर्षीय स्टफ नर्स पॉझिटिव्ह आल्याने नागपुरात खळबळ उडाली. विदर्भातील हे पहिले प्रकरण आहे. परंतु वैद्यकीय तज्ज्ञाच्या मते, ही दुर्मिळ घटना असलीतरी आश्चर्यकारक नाही. संबंधित नर्स पॉझिटिव्ह आल्यातरी त्यांना विषाणूचा दुष्परिणाम झाला नाही. त्यांचा ‘सिटी स्कॅन स्कोअर’ शून्य आहे. यामुळे लसीकरण प्रभावशाली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी पुन्हा नागपूर जिल्ह्याची दैनंदिन रुग्णसंख्या हजारावर गेली. परिणामी, कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग आला आहे. आता तिसऱ्या टप्प्यासाठी ६० वर्षांवरील ज्येष्ठांचे व ४५ वर्षांवरील ‘कोमॉर्बिडिटीज’असलेल्यांचे लसीकरण सुरू आहे. पहिला व दुसरा ‘बुस्टर’ डोस घेतल्यानंतर आपल्याला कोरोना होणार नाही, या समजुतीपोटी लसीकरण केंद्रावर गर्दी उसळली आहे. परंतु दुसऱ्या डोसनंतरही एक स्टाफ नर्स कोरोना पॉझिटिव्ह आल्याने चर्चेला तोंड फुटले आहे.
प्राप्त माहितीनुसार, कामठी उपजिल्हा रुग्णालयातील ४२ वर्षीय स्टाफ नर्सने १६ जानेवारी रोजी सीरम इन्स्टिट्यूटची ‘कोविशिल्ड’ लसीचा पहिला डोस घेतला. दि. १८ फेब्रुवारी रोजी दुसरा म्हणजे ‘बुस्टर डोस’ घेतला. नर्सला मधुमेह व उच्चरक्तदाब म्हणजे त्या ‘को-मॉर्बिडिटीज’ आहेत. हेल्थ वर्कर म्हणून त्यांना ही लस देण्यात आली. परंतु मागील काही दिवसांपासून त्यांना लक्षणे दिसून आल्यावर २ मार्चला त्या पॉझिटिव्ह आल्या. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांचा सिटी स्कॅनचा स्कोर शून्य असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांचे म्हणणे आहे.
-आश्चर्य वाटणारी घटना नाही
दुसऱ्या डोसनंतर १२ दिवसांनी लाभार्थी कोरोना पॉझिटिव्ह येत असेल तर आश्चर्य वाटणारी घटना नाही. परंतु दुर्मिळ घटना नाही. ही लस ७० टक्के प्रभावशील आहे. दुसऱ्या डोस घेतल्यानंतर लगेच त्याचा प्रभाव दिसून येत नाही. त्याला दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागतो. यांना १५ दिवसांच्या आत कोरोना झाला. परंतु त्यांना रुग्णालयात भरती होण्याची गरज पडली नाही, किंवा विषाणूचा दुष्परिणाम झाला नाही. दुसरा डोसमुळे १०० टक्के हॉस्पिटललायझेशन व मृत्यू वाचविला जाऊ शकतो.
-डॉ. नितीन शिंदे
संसर्गजन्य आजार विशेषज्ञ
::४२ वर्षीय स्टाफ नर्स
::१६ जानेवरी २०२१ पहिला डोस
::१८ फेब्रुवारी २०२१ दुसरा ‘बुस्टर’ डोस
::२ मार्च २०२१ कोरोना पॉझिटिव्ह