Corona Positive News; अकरा सदस्यांच्या कुटुंबात शिरला कोरोना; पण संयमाने जिंकले युद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 09:42 AM2021-04-28T09:42:35+5:302021-04-28T09:44:01+5:30
Coronavirus in Nagpur अडकिने कुटुंबाने कोरोनाविरुद्धचे युद्ध घरी राहूनच योग्य औषधोपचाराने जिंकले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाचा विळखा आता जवळपास प्रत्येकच कुटुंबांना पडला आहे. प्रत्येकाचे कोणी ना कोणी आप्त कायमचा खुडला गेला आहे. संक्रमण झाले की झाले, सगळे संपले, अशी भावना बहुतांश लोकांची झाली आहे. हॉस्पिटलची स्थिती, औषधांचा तुटवडा, अशा स्थितीत अनेक जण खचले आहेत. मात्र, अशाही स्थितीत संयमाने युद्ध जिंकणारेही अनेक आहेत. संकटाच्या काळात सगळेच संकटाने ग्रासले असल्याने, कुठेतरी समाधान असू शकते, याकडे दुर्लक्ष झाल्याने कोरोनाचा यशस्वी सामना करणारे दुर्लक्षित आहेत. असेच एक अडकिने कुटुंब आहे. या कुटुंबात ११ सदस्यांचा राबता आहे. या कुटुंबाने कोरोनाविरुद्धचे युद्ध घरी राहूनच योग्य औषधोपचाराने जिंकले आहे.
आधुनिक युगात एकत्र कुटुंबपद्धती जपणारे गोपाळकृष्णनगर, वाठोडा येथील अडकिने कुटुंब आहे. कुटुंबात मालती मधुकर अडकिने (८५) यांचे ज्येष्ठ पुत्र मदन अडकिने (६०), ज्येष्ठ सून संगीता मदन अडकिने (५३), कनिष्ठ पुत्र मंगेश अडकिने (४४), कनिष्ठ सून प्राजक्ता मंगेश अडकिने (३५), नणंद आशा अडकिने (७५), नातू मयूर मदन अडकिने (३०), नातसून नीलम मयूर अडकिने (२८), नात आचल मदन अडकिने (२३), नातू सिद्धेश (१०) व युवान (४) मंगेश अडकिने असे सदस्य आहेत. दोन अतिशय वृद्ध सदस्य असणाऱ्या या कुटुंबाने यथायोग्य वैद्यकीय सल्ला घेत आणि संयम बाळगत कोरोना संक्रमणाविरुद्धचा लढा यशस्वीरीत्या जिंकला आहे.
एमआरआय करायला गेलो असताना संसर्गामुळे कोरोनाची लागण झाली. माझ्यामुळे माझी पत्नी, मुलगी व भाऊ संक्रमित झाले. वर्तमान स्थिती बघता घाबरलो होतो. मात्र, डॉक्टरांचा सल्ला आणि संयमाने घरी राहूनच यशस्वी उपचार घेतले. यावेळी शेजारच्यांनी खूप साथ दिली.
- मदन अडकिने
संक्रमण होताच श्वास घेण्यास त्रास झाला आणि सीटी स्कॅन स्कोर १६ निघाला. त्यामुळे, मला ॲडमिट व्हावे लागले. हॉस्पिटलमध्ये सतत सकारात्मक विचार सुरू ठेवले आणि सुखरूप बाहेर पडलो.
- मंगेश अडकिने
मोठी सून असल्याने घराची संपूर्ण जबाबदारी माझी होती. मात्र, मलाच लागण झाल्याने भीती वाटायला लागली. दोन वृद्ध, लहान मुले यांचे कसे होणार, ही भीती होती. मात्र, जाऊबाईने सर्व सांभाळले आणि आम्ही कोरोनामुक्त झालो.
- संगीता अडकिने
घरातील प्रमुख व्यक्ती कोरोनाबाधित झाल्यावर घराबाहेरील सगळी जबाबदारी माझ्यावर आली. डॉक्टर, औषधे, प्लाझ्मा आदींमध्ये धावपळ केली. मात्र, मी सकारात्मक होतो. अनुभवही गाठीशी आला. कोरोनावर यशस्वी मात केल्याचा आनंद आहे.
- मयूर अडकिने
......................