नागपुरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा रुग्णालयातून पळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 03:58 PM2021-03-13T15:58:54+5:302021-03-13T16:00:43+5:30
Nagpur News मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या २७ वर्षीय कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आज शनिवारी सकाळी ७ वाजता पळून गेल्याने खळबळ उडाली. त्याचा शोध घेऊन हिंगणघाट येथील घरी त्याला पकडण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या २७ वर्षीय कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आज शनिवारी सकाळी ७ वाजता पळून गेल्याने खळबळ उडाली. याची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर त्याचा शोध घेऊन हिंगणघाट येथील घरी त्याला पकडण्यात आले. या घटनेने पुन्हा एकदा कोविड हॉस्पिटलच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
हिंगणघाट मानगाव कोपरा येथील रहिवासी असलेला या रुग्णाला डोक्याला जबर मार बसल्याने २६ फेब्रुवारी रोजी मेडिकलमध्ये भरती करण्यात आले . ३ मार्च रोजी त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. परंतु काही दिवसांनी बोलण्यात स्पष्टता नसल्याने तेथील स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले. याच दरम्यान त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. यामुळे १२ मार्च रोजी पहाटे १ वाजता कोविड हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. १३ मार्च रोजी पहाटे ७ वाजता सुरक्षा रक्षकांच्या हातावर तुरी ठेवत तो पळून गेला. सकाळी राऊंडवर असलेल्या डॉक्टरांच्या ही बाब लक्षात येताच त्याचा शोधशोध घेतला. परंतु कुठेच आढळून न आल्याने पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने त्याचा शोध घेतला. पोलिसांना रुग्ण हा हिंगणघाट येथील घरीच सापडला. मेडिकल ते हिंगणघाट त्याने कशाने प्रवास केला. त्याच्या संपर्कात कोण आले याचा शोध घेऊन त्यांना क्वारंटार्इं केले जाणार आहे. चार ते पाच दिवसांनंतर त्यांचीही कोरोनाची तपासणी केली जाईल, अशी माहिती संबंधित आरोग्य अधिकाºयांनी दिली.
-रुग्णालयातून पळून जाणे, गुन्हा दाखल होणार
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने रुग्णालयातून पळून जाणे हा गुन्हा आहे. या बाबत रितसर तक्रार पोलीस ठाण्यात केली जाईल. समाजासाठी धोकादायक ठरणाºया अशा रुग्णांवर गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे.
-डॉ. अविनाश गावंडे
वैद्यकीय अधिक्षक, मेडिकल