यंदा नवरात्रोत्सवात गरबा, दांडिया नृत्याला ब्रेक; अनेकांच्या आनंदावर विरजण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 01:28 PM2021-10-08T13:28:46+5:302021-10-08T15:48:02+5:30
जिल्ह्यात ७ ते १५ ऑक्टोबर दरम्यान नवरात्र दुर्गापूजा, दसरा सण साजरा करण्यात येणार आहे. मात्र, कोरोना संकटामुळे खबरदारी म्हणून नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घ्यावी. गरबा, दांडिया, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी केले आहे. (Navratri in Nagpur)
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवरात्रोत्सवात गरबा-दांडिया नृत्याची नेहमीच धूम असते. वातावरण प्रसन्न दांडियाची मैदाने सजलेली आणि हातात सुंदर दांडिया धरून नटून-थटून पेहरावात आलेली मंडळी पाहण्याची मजा काही औरच असते. ए हालो म्हणत एकच जल्लोश सुरू असतो. मात्र, मागिल दोन वर्षात कोरोनामुळे या उत्सवातील आनंदावर विरजण आलं आहे.
जिल्ह्यात ७ ते १५ ऑक्टोबर दरम्यान नवरात्र दुर्गापूजा, दसरा सण साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात नवरात्र उत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घ्यावी. गरबा, दांडिया, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी केले आहे.
सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांनी स्थानिक प्रशासनाच्या धोरणानुसार यथोचित पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. कोविड -१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण याच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारावेत. यावर्षीचा नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या अनुषंगाने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मूर्तीची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी.
- अशा आहेत सूचना
-देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळासाठी ४ फूट व घरगुती देवीच्या मूर्तीची उंची ३ फूट मर्यादेत असावी
-घरातील धातू- संगमरवर या मूर्तीचे पूजन करावे. शाडूची किंवा पर्यावरणपूरक मूर्ती असल्यास घरी विसर्जन करावे.
- मूर्तीचे घरच्या घरी वा कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात यावे.
- घरी विसर्जन शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जनाच्या स्थळी विसर्जन करण्यात यावे.
- नवरात्रोत्सवाकरिता वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा.
- जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही याची खबरदारी घ्यावी.
-आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती द्यावी.
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेबाबत जनजागृती करावी.
- गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत.
आरोग्यविषयक उपक्रम, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात यावे. साथरोग जसे कोरोना, मलेरिया, डेंग्यू, इतर आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती करावी.
देवीच्या दर्शनासाठी ऑनलाईन व्यवस्था करण्यात यावी.
- आरती, भजन, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.
ध्वनी प्रदूषण संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे.
- मंडपात एकावेळी ५ पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी.
- देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.
उत्साहावरील निर्बंध आवडण्यासारखे नाहीत मात्र, आपल्या व आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी प्रत्येकाने हे नियम पाळलेच पाहिजे. कोरोनाला हरवण्यासाठी याहून दुसरा चांगला उपाय सध्या तरी शक्य नाही. त्यामुळे हे संकट टाळण्यासाठी वर दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे अतिशय महत्वाचे आहे. जेणेकरून पुढील वर्षीचा प्रत्येक सण-उत्सव आपल्याला आनंदाने साजरा करता येईल.