कोरोनामुळे गणेशोत्सवात मिठाईची ७० टक्के विक्री घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 11:07 PM2020-08-26T23:07:35+5:302020-08-26T23:08:57+5:30
गर्दीतून संसर्ग होण्याच्या भीतीने अनेक निवासी सोसायट्यांमध्ये यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम मिठाईच्या विक्रीवर झाला असून यंदा गणेशोत्सवात लोकांची वर्दळ नसल्याने सर्वाधिक विकले जाणारे पेढे, मोदक आणि लाडूंच्या विक्रीत ७० टक्क्यांची घट झाल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संसर्गाचा परिणाम गणेशोत्सवावर दिसून येत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय गर्दीतून संसर्ग होण्याच्या भीतीने अनेक निवासी सोसायट्यांमध्ये यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम मिठाईच्या विक्रीवर झाला असून यंदा गणेशोत्सवात लोकांची वर्दळ नसल्याने सर्वाधिक विकले जाणारे पेढे, मोदक आणि लाडूंच्या विक्रीत ७० टक्क्यांची घट झाल्याची माहिती आहे.
हॉटेल मालक म्हणाले, कोरोनामुळे गणेशोत्सवात मिठाईची विक्री कमी होण्याच्या शक्यतेने यंदा मिठाई कमी प्रमाणात तयार केली आहे. मिठाई दुधापासून तयार होते. त्यामुळे जास्त दिवस ठेवता येत नाही. खराब झाल्याने आर्थिक नुकसान होते. यंदा ग्राहक कमी प्रमाणात येत आहेत. भक्त घरी, सोसायटी वा सार्वजनिक गणेशोत्सवात प्रसाद वाटपासाठी मिठाईची खरेदी करतात. पण यावर्षी भक्तांमध्ये उत्साह नाही. सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येत असल्याने लोकांमध्ये निरुत्साह आहे. मंडळाचे पदाधिकारी सकाळी आणि सायंकाळी आरती करून मंडप पडद्याने झाकून ठेवतात. याशिवाय भक्तही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात जाण्यास उत्सुक नाहीत. या सर्व कारणांमुळे मिठाईची विक्री कमी झाली आहे. त्यामुळे यंदा हॉटेल मालकांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. किती कोटींचे नुकसान होईल, याची आकडेवारी उपलब्ध नाही.
नागपुरात ५०० पेक्षा जास्त मिठाईची दुकाने आहेत. यंदा कोरोनामुळे हॉटेल मालकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. जास्त मिठाई तयार केली तर ती फेकावी लागेल, अशी भीती हॉटेल मालकांमध्ये आहे. यापूर्वी रक्षाबंधनसणातही मिठाई कमी प्रमाणात तयार केली होती. कच्च्या मालाचे दर वाढल्यानंतरही मिठाईचे दर वाढले नाहीत. मिठाई तयार करणारे कारागीर बाहेरगावचे असल्याने त्यांना यंदा बोलविण्यात आलेले नाही. आता हॉटेलमधील कारागीर मिठाई तयार करीत आहेत. सध्या ऑडर आल्यानंतरच मिठाई तयार करण्यात येत असल्याचे हॉटेल मालकांनी सांगितले.
गणेशोत्सवात मिठाईची ३० टक्के विक्री
यंदा सार्वजनिक गणेशोत्सवावर बॅन असल्याने भक्तांमध्ये उत्साह दिसून येत नाही. अनेक सोसायट्यांमध्ये कोरोना संसर्गाच्या भीतीने गणेशोत्सव साजरा केला नाही. महाराष्ट्रात गणेशोत्सव आनंदाचा उत्सव आहे. दहा दिवस लोक एकत्र येतात. यंदा कोरोनामुळे उत्साह मावळला आहे. पेढे, मोदक आणि लाडूंची विक्री कमी झाली आहे. यंदा केवळ ३० टक्के विक्रीची अपेक्षा आहे.
दीपक अग्रवाल, आर्य भवन, सीताबर्डी.
ऑर्डरनुसार तयार होते मिठाई
पूर्वी गणेशोत्सवात मिठाईचे वेगळे काऊंटर असायचे. मोदक व पेढ्यासाठी मंडळाचे ऑडर असायचे. पण यंदा स्थिती विपरीत आहे. मंडळाचे आॅर्डर नाहीत. भक्तांनीही खरेदीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे यंदा हॉटेलमध्ये वेगळे काऊंटर लावले नाही. दुधापासून तयार होणारी मिठाई खराब होत असल्याने केवळ ऑर्डरनुसार तयार करण्यात येत आहे.
राम भंडार, सी. गुप्ता, नंदनवन.