कोरोनामुळे विमान प्रवासी ७५ टक्क्यांनी घटले; कंपन्यांना मोठा तोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 10:58 AM2020-11-10T10:58:57+5:302020-11-10T10:59:28+5:30
Nagpur News travel यावर्षी विमान प्रवाशांची संख्या ७५ टक्क्यांनी कमी झाली. त्यामुळे विमान कंपन्यांच्या महसुलात घट झाली. उपराजधानीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळालाही मोठे नुकसान सहन करावे लागले.
श्रेयस होले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विमान उद्योगाला कोरोनाचा जोरदार फटका बसला आहे. या स्थितीत कोरोनाची दुसरी लाट आल्यास परिस्थिती आणखी वाईट होऊ शकते. यावर्षी विमान प्रवाशांची संख्या ७५ टक्क्यांनी कमी झाली. त्यामुळे विमान कंपन्यांच्या महसुलात घट झाली. उपराजधानीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळालाही मोठे नुकसान सहन करावे लागले.
गेल्या वर्षी नागपूर विमानतळाने ५० कोटी रुपयाचा नफा कमावला होता. यावर्षी परिस्थिती खूपच वाईट आहे. विमानतळ संचालक आबीद रुही यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनापूर्वी नागपूर विमानतळावरून रोज ३१ ते ३४ विमाने उडत होती. सध्या केवळ १३ ते १७ विमाने उडतात. तसेच, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी विमान प्रवाशांची संख्या ७५ टक्क्यांनी कमी झाली. सणोत्सवाच्या काळामध्ये हा व्यवसाय पुन्हा भरारी घेईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, परंतु तसे घडू शकले नाही. विमानांची संख्या वाढली नाही, उलट प्रवाशांच्या कमतरतेमुळे निर्धारित विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली.
या काळामध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होते. दरम्यान, अनेक खासगी विमाने नागपूर विमानतळावर उतरतात. त्यातून विमानतळाला अतिरिक्त महसूल प्राप्त होतो. यावर्षी हिवाळी अधिवेशन मुंबईमध्ये घेतले जाईल असे बोलले जात आहे. तसे झाल्यास विमानतळाच्या नुकसानीमध्ये आणखी भर पडेल. महसूल कमी झाल्यामुळे विमानतळ विस्ताराची योजना व इतर विकास कामे तात्पुरती थांबविण्यात आली आहेत. सध्या केवळ अत्यंत महत्त्वाची कामे केली जात आहेत.