विदर्भात नागपूरसह अमरावतीत वाढतोय कोरोना : १०८७ नवे रुग्ण, ११ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 11:53 PM2021-02-11T23:53:45+5:302021-02-11T23:57:42+5:30
Corona on the rise in Vidarbha विदर्भात ‘ट्रेसिंग’, ‘टेस्टिंग’ आणि ‘ट्रिटमेंट’ला फारसे गंभीरतेने घेतले जात नसल्याने कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. गुरुवारी नागपूरसह अमरावती जिल्ह्यात पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. नागपुरात ५००, तर अमरावती जिल्ह्यात ३१५ नव्या रुग्णांची भर पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात ‘ट्रेसिंग’, ‘टेस्टिंग’ आणि ‘ट्रिटमेंट’ला फारसे गंभीरतेने घेतले जात नसल्याने कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. गुरुवारी नागपूरसह अमरावती जिल्ह्यात पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. नागपुरात ५००, तर अमरावती जिल्ह्यात ३१५ नव्या रुग्णांची भर पडली. नव्या वर्षांत पहिल्यांदाच १०८७ नव्या रुग्णांची व ११ मृत्यूची भर पडली. बाधितांची एकूण संख्या २,८१,१५० तर मृतांची संख्या ७०७७वर पोहोचली.
आरोग्य विभागाने मागील आठवड्यात राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत विदर्भात कोरोनाबाबत लक्ष वेधून घेणारे ‘इंडिकेटर्स’ दिले होते. यात अमरावतीमध्ये ३.१५ टक्के, यवतमाळमध्ये २.८ टक्के, अकोलामध्ये २.२४ टक्के, तर वर्धामध्ये २.१६ टक्के रुग्णांत वाढ झाल्याचे नमूद केले. साप्ताहिक मृत्युदरात पहिल्या पाच जिल्ह्यात दुसऱ्यास्थानी भंडारा जिल्हा, तर तिसऱ्यास्थानी गडचिरोली जिल्हा होता. पॉझिटिव्हीटीमध्येही अमरावती जिल्हा तिसऱ्यास्थानी, नागपूर जिल्हा चौथ्या स्थानी होता. नुकत्याच भेट दिलेल्या केंद्रीय आरोग्य पथकानेही वाढते रुग्ण व मृत्युदराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
दोन दिवसांत २१७१ रुग्णांची भर
विदर्भात बुधवारी दोन दिवसांत एकूण २१७१ नव्या रुग्णांची भर पडली. आज नागपूर जिल्ह्यात ५०० रुग्ण व पाच मृत्यू, भंडारा जिल्ह्यात सात रुग्ण, वर्धा जिल्ह्यात ४४ रुग्ण, गोंदिया जिल्ह्यात चार रुग्ण, चंद्रपूर जिल्ह्यात १५ रुग्ण व एक मृत्यू, अकोला जिल्ह्यात ७७ रुग्ण व एक मृत्यू, अमरावती जिल्ह्यात ३१५ रुग्ण व एक मृत्यू, यवतमाळ जिल्ह्यात ५१ रुग्ण व एक मृत्यू, बुलढाणा जिल्ह्यात ६५ रुग्ण व एक मृत्यू तर वाशिम जिल्ह्यात नऊ रुग्ण व एक मृत्यूची नोंद झाली. गडचिरोली जिल्ह्यात रुग्ण किंवा मृत्यूची नोंद झाली नाही.
मध्यवर्ती कारागृहात १५ कोरोना संशयित
नागपूर : मध्यवर्ती कारागृहातील पाच बंदिवान बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. प्रशासनाने याची गंभीर दखल यांच्या संपर्कात आलेल्या १५ बंदिवानांची गुरुवारी कोरोना चाचणी केली. यांचा अहवाल आल्यावर उर्वरीत कैद्यांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, पॉझिटिव्ह आलेल्या बंदिवानाच्या लक्षणावरून मेडिकलमध्ये भरती केले जाणार आहे.
कोरोनाची स्थिती
जिल्हा रुग्ण मृत्यू
नागपूर ५०० ५
भंडारा ७ ०
वर्धा ४४ ०
गोंदिया ४ ०
चंद्रपूर १५ १
अकोला ७७ १
अमरावती ३१५ १
यवतमाळ ५१ १
बुलढाणा ६५ १
वाशिम ९ १
गडचिरोली ० ०