कोरोनामुळे मूर्तिकारांचे आर्थिक गणित बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:18 AM2021-09-02T04:18:28+5:302021-09-02T04:18:28+5:30

मंडळांची संख्या झाली कमी : मूर्तींचे घटले आकार; रंग, माती आणि मजुरीही वाढली नागपूर : गणेश उत्सवाचे दुसरेही वर्ष ...

The corona ruined the sculptor's financial mathematics | कोरोनामुळे मूर्तिकारांचे आर्थिक गणित बिघडले

कोरोनामुळे मूर्तिकारांचे आर्थिक गणित बिघडले

Next

मंडळांची संख्या झाली कमी : मूर्तींचे घटले आकार; रंग, माती आणि मजुरीही वाढली

नागपूर : गणेश उत्सवाचे दुसरेही वर्ष कोरोनाच्या सावटात साजरे होणार आहे. कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने उत्सवाला नियम आणि चौकटी घालून दिल्या आहेत. त्यामुळे मंडळांची संख्या कमी झाली आहे. पर्यायाने चितारओळीतील मंडळाच्या गणेशाच्या मूर्तीनिर्मितीवरही परिणाम झाला आहे. मूर्तिकारांचे वर्षभराचे व्यवस्थापन गणेश उत्सवावर असते, सलग दोन वर्षांपासून ते गडबडत आहे. बाप्पा लवकरच परिस्थिती सुधारेल, या अपेक्षेने मूर्तिकार आलेल्या ऑर्डरच्या मूर्तींवर अखेरचा हात फिरवत आहेत.

गणेश उत्सवाला आजपासून दहा दिवस शिल्लक आहे. या काळात प्रत्येक मूर्तिकाराच्या घरात, घरापुढे गणेशाच्या मूर्ती साकारण्याचे काम सुरू असायचे. गल्ल्यांमध्ये पाय ठेवायला जागा राहत नव्हती. यंदा चितारओळीतील रस्ता मोकळा आहे. मूर्तिकार घरातच गणेशाला घडवित आहे. कोरोनाने गणेश उत्सवाचा आनंद आणि मूर्तिकारांच्या हातचे काम कमी केले आहे. प्रशासनाने कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी नियमांच्या याद्या मंडळाला दिल्या. त्यामुळे काही मंडळांनीही नियम आणि जनतेचे आरोग्य लक्षात घेता गणेश उत्सवाला कोरोना संपेपर्यंत विराम दिला आहे.

- ६ ते ७ हजारांवर मूर्ती साकारल्या जायच्या चितारओळीत

चितारओळीत किमान ५० च्यावर मूर्तिकार आहे. मूर्तीकामात नागपूरपुरतीच चितारओळ मर्यादित नाही तर पूर्व विदर्भ, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील जिल्ह्यातून मंडळाचे गणपती चितारओळीत तयार व्हायचे. गणेश उत्सवाच्या तीन-चार दिवसांपूर्वीच बाहेरगावच्या मूर्ती रवाना व्हायच्या. जवळपास ६ ते ७ हजार मूर्तींची निर्मिती चितारओळीतून व्हायची. पण गेल्या वर्षीपासून बाहेरगावच्या मंडळांच्या ऑर्डर्स येत नाहीत. स्थानिक मंडळांनी सुद्धा मूर्तीची ऑर्डर दिलेली नाही.

- नागपूरचा राजा यंदा ४ फुटांचा

महालातील नागपूरचा राजाची भव्य मूर्ती आकर्षक देखाव्यामुळे बहुतांश नागपूरकर गणेश उत्सवादरम्यान येथे येऊन दर्शन घ्यायचे. मंडळाने सुद्धा दरवर्षी मूर्तीचा आकार वाढविण्याचा संकल्प केला होता. पण कोरोनाने गणेश उत्सवात घालून दिलेल्या नियमांमुळे यंदा नागपूरचा राजा ४ फुटांचा राहणार आहे. नागपूरच्या राजाची मूर्ती साकारणारे शरद, विनोद व विजय सूर्यवंशी यांनी गेल्या वर्षी ११ फुटांची मूर्ती साकारली होती. पण कोरोनामुळे या मूर्तीची स्थापना मंडळाला करता आली नाही. आजही ती मूर्ती या मूर्तिकारांच्या वर्कशॉपमध्ये आहे. नागपूरचा राजाच नाही तर शहरातील दीडशेहून अधिक मंडळांच्या मूर्तीचा आकार १० फुटांवरच राहायचा. नियमांमुळे बहुतांश मंडळांनी ४ फुटांच्या गणपतीच्या निर्मितीची ऑर्डर दिली असल्याचे शरद सूर्यवंशी म्हणाले.

- यंदा मंडळाच्या सक्रिय सदस्यांनी केली वर्गणी गोळा

गांधीनगरातील बाल विजय समाज मंडळाचा गणेश उत्सव उत्साहात साजरा व्हायचा. कार्यकर्ते वर्गणीच्या रूपात मोठे कलेक्शन करायचे. भरपूर स्पॉन्सरशिप देखील यायची. त्यामुळे मंडळाची मूर्ती भव्य असायची. गेल्या वर्षीपासून मंडळाचे कार्यकर्ते स्वत:च कलेक्शन करून उत्सव साजरा करीत आहेत. नियमानुसार यंदा ४ फुटांच्या गणपतीचा ऑर्डर दिली आहे.

मोरुभाऊ पिंपळे, अध्यक्ष बाल विजय समाज

Web Title: The corona ruined the sculptor's financial mathematics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.