रेल्वेमध्ये कोरोना नियम पायदळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:08 AM2021-04-22T04:08:48+5:302021-04-22T04:08:48+5:30
आनंद शर्मा नागपूर : नागपूरसह देशभरात वेगाने पसरत चाललेल्या कोरोना संक्रमणामुळे सरकार, प्रशासनासह जनताही त्रस्त आहेत. या काळात कोरोना ...
आनंद शर्मा
नागपूर : नागपूरसह देशभरात वेगाने पसरत चाललेल्या कोरोना संक्रमणामुळे सरकार, प्रशासनासह जनताही त्रस्त आहेत. या काळात कोरोना नियमांचे कटाक्षाने पालन करण्याचे आवाहन रेल्वे विभागाकडून होत आहे. असे असले तरी अनेक प्रवासी मास्क न वापरता प्रवास करत असून सुरक्षेच्या नियमांचेही पालन करीत नसल्याचे चित्र सध्या रेल्वेत दिसत आहे. हे थांबविण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रवाशांवर दंड ठोठावत असले तरी अनेक प्रवाशांमध्ये बेफिकिरी दिसत आहे.
कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी मास्कचा वापर आवश्यक असल्याचे डॉक्टर सांगत आहेत. केंद्र व राज्य सरकारही याबद्दल जनजागृती करीत आहे. तरीही अनेकजण याकडे पाठ फिरवित आहेत. प्रवासी स्टेशनवर येताना त्यांच्या तोंडावर मास्क दिसतो, मात्र नंतर रेल्वे सुरू होताच अनेकांचे मास्क हनुवटीवर येतात, अनेकजण काढून खिशात ठेवतात. सुरक्षित अंतराचे पालन न करता बर्थवर अगदी जवळ बसतात.
उत्तराखंडमधील कुंभ मेळ्यात सहभागी झालेले अनेकजण आता रेल्वेने गावाकडे परत निघाले आहेत. हरिद्वारमधील कुंभ मेळ्यात गेलेले अनेकजण संक्रमित झाले आहेत. अशा वातावरणात सुरक्षा नियमांचे पालन न करता रेल्वेमधून होणारा प्रवास धोकादायक ठरत आहे.
...
कोट
रेल्वे प्रवासात नियमांचे पालन प्रवासी करत आहेत अथवा नाही, हे रेल्वे प्रशासनाने लक्षात घ्यावे. असे होत नसल्याने धोका वाढणार आहे. संक्रमण टाळण्यासाठी प्रतिबंध आणि कोरोना नियमांची जनजागृती आवश्यक आहे.
- बसंत कुमार शुक्ला, महासचिव, भारतीय यात्री केंद्र
...
कोट
रेल्वे प्रशासन वारंवार नियमांचे पालन करण्यासाठी आवाहन करीत आहे. उद्घाेषणा प्रणालीच्या माध्यमातूनही सातत्याने सांगितले जात आहे. मास्क न वापरणारे, सुरक्षित अंतराचे पालन न करणारे, नियम तोडणाऱ्यांवर ५०० रुपयांचा दंड आकारण्याच्या सूचना तिकीट चेकिंग स्टाफ आणि आरपीएफ जवानांना दिल्या आहेत.
- विपुल सुस्कर, प्रभारी जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर मंडळ
...