ग्रामीण भागात कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:07 AM2021-01-10T04:07:57+5:302021-01-10T04:07:57+5:30
सावनेरात २१ तर हिंगण्यात ४ रुग्णांची नोंद सावनेर/काटोल/हिंगणा/कन्हान : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गत काही दिवसात कमी झालेले कोरोनाचे ...
सावनेरात २१ तर हिंगण्यात ४ रुग्णांची नोंद
सावनेर/काटोल/हिंगणा/कन्हान : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गत काही दिवसात कमी झालेले कोरोनाचे संक्रमण पुन्हा वाढताना दिसत आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे नागरिकांकडून होणारे उल्लंघन हे यामागचे मुख्य कारण आहे.
सावनेर तालुक्यात शनिवारी २१ रुग्णांची नोंद झाली. यात १६ रुग्ण शहरातील तर ५ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागात चार रुग्ण हे चिचोली प्राथमिक आरोग्य केंद्र क्षेत्रातील तर एक रुग्ण पाटणसावंगी केंद्र क्षेत्रातील आहे. हिंगणा तालुक्यात शनिवारी १२६ नागरिकांच्या चाचण्या घेण्यात आल्या. यात वानाडोंगरी,कान्होलीबारा, नीलडोह व डिगडोह परिसरातील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३,८५७ झाली आहे. यातील ३,६४९ रुग्ण बरे झाले आहे तर ९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काटोल तालुक्यात शनिवारी ८२ नागरिकांच्या चाचणी करण्यात आल्या. तीत तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात काटोल शहरातील चांडकनगर येथील एकाचा तर ग्रामीण भागामध्ये सोनपूर, लाडगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. कन्हान परिसरातील जे.एन. हॉस्पिटल, कांद्री येथे शनिवारी तिघांची कोरोना चाचणी करण्यात आली. तीत एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आतापर्यंत ८९३ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. यातील ८३५ रुग्ण उपचाराअंती बरे झाले तर २५ रुग्णांचा मृत्यू झाला.