कोरोना, डेंग्यूची लक्षणे सारखीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:07 AM2021-07-23T04:07:20+5:302021-07-23T04:07:20+5:30
नागपूर : ढगाळ वातावरण, पाऊस, मध्येच पडणारे ऊन या वातावरणातील बदलामुळे जीवाणू आणि विषाणूंसोबतच डासांच्या प्रादुर्भावाचे प्रमाण वाढले आहे. ...
नागपूर : ढगाळ वातावरण, पाऊस, मध्येच पडणारे ऊन या वातावरणातील बदलामुळे जीवाणू आणि विषाणूंसोबतच डासांच्या प्रादुर्भावाचे प्रमाण वाढले आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी डेंग्यूचे रोज पाच ते दहा नवीन रुग्ण आढळून येत आहे. ताप, सर्दी व खोकला ही कोरोनाचीही प्राथमिक लक्षणे आहेत. हीच लक्षणे डेंग्यूमध्येही आढळून येतात. यामुळे लक्षणे दिसताच डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करून घेण्याचे आवाहन केले जात आहे.
पहिल्या लाटेच्या तुलनेत कोरोनाची दुसरी लाट अधिक भयावह होती. सध्या ही लाट ओसरली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. यात सर्वाधिक लहान मुले प्रभावित होण्याची शक्यता तज्ज्ञानी वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने तयारी हाती घेतली आहे. सध्या कोरोनाचे रोज १० ते १५ रुग्ण आढळून येत आहे. मात्र, पावसाचा जोर वाढल्याने शहर आणि ग्रामीण भागात डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. जानेवारी ते १४ जुलै या दरम्यान शहरात १८० तर ग्रामीणमध्ये १११ रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, शहरात मागील १४ दिवसात ९६ नवे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. यामुळे लक्षणे दिसताच डॉक्टर डेंग्यू आणि कोरोनाची चाचणी करण्याचा सल्ला देत आहे.
:: चाचणी कुठली?
कोरोनासाठी -‘आरटीपीसीआर’ किंवा ‘रॅपीड अँटिजेन टेस्ट’
डेंग्यूसाठी - ‘एनएस १ अँटिजन’, किंवा ‘आयजीजी’, ‘आयजीएम’ अँटीबॉडीज’
-डेंग्यूमध्ये खूप जास्त ताप
मेडिकलचा औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील म्हणाले, डेंग्यूमध्ये १०४ डिग्रीपर्यंत ताप येतो, डोकेदुखी, स्नायू, हाडे आणि सांधेदुखी, मळमळणे, उलट्या होणे, डोळ्याच्या मागे वेदना होणे आणि शरीरावर पुरळ येणे आदी लक्षणे दिसून येतात. कोरोनाची प्राथमिक लक्षणे ही सर्दी, खोकला, ताप येणे ही आहेत. दोन ते तीन दिवस अंगातील ताप हा कमी होतो आणि पुन्हा वाढतो. वास येत नाही, चव लागत नाही. आदी लक्षणे दिसून येतात.
-डेंग्यू व कोरोनावर निश्चित उपचार नाहीत
सध्या डेंग्यू व कोरोनावर निश्चित उपचार नाहीत. लक्षणे पाहून उपचार केले जातात. कोरोनाच्या गंभीरतेला दूर ठेवण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. सोबतच गर्दी टाळणे, दुहेरी मास्क घालणे, सतत हात धुणे, फिजिकल डिस्टंन्सिंग पाळणे आवश्यक आहे तर, डेेंग्यू हा आजार डासामुळे होतो. यामुळे पाणी साचून राहणार नाही, स्वच्छता पाळणे व आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे आवश्यक आहे. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी रुग्णाला डासमुक्त ठिकाणी हलविणे महत्त्वाचे ठरते.
-डॉ. प्रशांत पाटील, प्रमुख, मेडिसीन विभाग, मेडिकल
डेंग्यूचे रुग्ण
२०१९ :६२७
२०२० : १०७
२०२१ : २९१
(१४जुलैपर्यंत)