नागपुरात कोरोनाचा वेग मंदावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:08 AM2021-05-14T04:08:22+5:302021-05-14T04:08:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याने महामारीचा वेग मंदावल्याचे दिसून येत आहे. मागील २४ तासात २,२२४ ...

Corona slowed down in Nagpur | नागपुरात कोरोनाचा वेग मंदावला

नागपुरात कोरोनाचा वेग मंदावला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याने महामारीचा वेग मंदावल्याचे दिसून येत आहे. मागील २४ तासात २,२२४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. एप्रिल महिन्यानंतरचा हा सर्वात कमी आकडा आहे. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,५८,६०४ झाली आहे. गुरुवारी ७७ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे मृत्यूंची संख्या ८,४०२ झाली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी १३ सप्टेंबर रोजी रुग्णसंख्येने उच्चांक गाठत २,३४३चा आकडा ओलांडला असताना हाहाकार उडाला होता. परंतु, यावर्षी २४ एप्रिल रोजी ७,९९९वर गेलेली रुग्णसंख्या आज दोन हजारांवर आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

नागपूर जिल्ह्यात सलग १४ दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. मात्र, त्यासोबतच चाचण्यांच्या संख्येतही मोठी घट होऊ लागली आहे. हे धोक्याचे संकेत तर नाहीत ना, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. १३ एप्रिल रोजी आतापर्यंतच्या सर्वाधिक २९,१२२ चाचण्या झाल्या होत्या. त्यानंतर २४ ते २५ हजार दरम्यान चाचण्या होत होत्या. परंतु, २ मेपासून ही संख्या १५ ते २० हजारांच्या घरात आली आहेत. गुरुवारी १५,७१४ चाचण्या झाल्या. यात १२,६५५ आरटीपीसीआर तर ३,०५९ रॅपिड अँटिजन चाचण्या होत्या. गुरुवारी ५,८८४ रुग्ण बरे झाले. कोरोनामुक्त होण्याचा दर वाढला असून, तो ८८ टक्क्यांवर गेला आहे. आतापर्यंत ४,१०,५८६ रुग्ण बरे झाले आहेत.

मृत्यूंची संख्या कधी कमी होणार?

रुग्णसंख्येत मोठी घट दिसून येत असताना मृत्यूंचे प्रमाण अद्यापही चिंता व्यक्त करणारे आहे. कोरोनाच्या या १४ महिन्यांच्या काळात सर्वाधिक मृत्यूंची नोंद २२ एप्रिल २०२१ रोजी झाली. यादिवशी ११० रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर दैनंदिन ८० ते ९० रुग्णांचे मृत्यू होत होते. मागील सात दिवसात ही संख्या ७० ते ८०वर आली असली तरी मृत्यूचे प्रमाण कधी कमी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शहर आणि ग्रामीणमध्ये केवळ ११३ रुग्णांचा फरक

शहरात आज १,१६३ रुग्ण व ४१ मृत्यूंची नोंद झाली तर ग्रामीण भागात १,०५० रुग्ण व २५ मृत्यूंची नोंद झाली. शहर आणि ग्रामीणमध्ये केवळ ११३ रुग्णांचा फरक असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहरात रुग्णांची एकूण संख्या ३,२३,१२५ व मृतांची संख्या ५,०६० झाली आहे. ग्रामीणमध्ये १,३४,०८४ रुग्ण व २,१२९ मृत्यूंची नोंद झाली आहे.

कोरोनाची गुरुवारची स्थिती

दैनिक चाचण्या : १५,७१४

एकूण बाधित रुग्ण : ४,५८,६०४

सक्रिय रुग्ण : ३९,६१६

बरे झालेले रुग्ण : ४,१०,५८६

एकूण मृत्यू : ८,४०२

Web Title: Corona slowed down in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.