कीटकजन्य आजार निर्मूलनाला कोरोनाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 08:30 PM2020-07-14T20:30:21+5:302020-07-14T20:31:57+5:30
पावसाळ्यात कीटकजन्य आजाराचे रुग्ण आढळून येतात. या आजारांपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी दरवर्षी आरोग्य यंत्रणेमार्फत जनजागृती मोहीम राबविली जाते. परंतु सध्या कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या कीटकजन्य आजार निर्मूलनाला फटका बसला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाळ्यात कीटकजन्य आजाराचे रुग्ण आढळून येतात. या आजारांपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी दरवर्षी आरोग्य यंत्रणेमार्फत जनजागृती मोहीम राबविली जाते. परंतु सध्या कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या कीटकजन्य आजार निर्मूलनाला फटका बसला आहे. जनजागृती व घराघरांची तपासणी मोहीम रेंगाळली आहे. परिणामी, डेंग्यू, हिवताप व फायलेरिया यासारखे कीटकजन्य आजार डोके वर काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हवामानातील बदलांचा थेट मानवी आरोग्यावर परिणाम होतो. पावसाळा सुरू झाल्यास कीटकजन्य आजार वाढतात. त्या अनुषंगाने आरोग्य विभागामार्फत दरवर्षी विविध जनजागृती उपक्रम राबविले जातात. विशेषत: डेंग्यू, मलेरिया, फायलेरिया आदीबाबत शाळाशाळांमध्ये जाऊन जनजागृती केली जात होती. घराघरांची तपासणी करून डेंग्यू प्रतिबंधक मोहीम चालविली जात होती. संशयित रुग्णांचे रक्ताचे नमुने घेऊन तपासले जात होते. परंतु सध्या आरोग्य यंत्रणेचे संपूर्ण लक्ष कोरोनाच्या रुग्णांकडे लागले आहे. बहुसंख्य मनुष्यबळ याच आजाराच्या रुग्णसेवेत आहे. यामुळे इतरही आजारांचा धोका वाढला आहे.
या येत आहेत अडचणी
मनुष्यबळ साधनांचा अभाव
प्रतिबंधित क्षेत्रातील बंधने
कोरोनामुळे लोकांमध्ये निर्माण झालेले गैरसमज व भीती
आरोग्य यंत्रणेचे आवाहन
आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा
छतावर किंवा इतर ठिकाणी पाणी साचून राहणार नाही याकडे लक्ष ठेवा
घर आणि परिसर स्वच्छ ठेवा
सर्दी, खोकला, ताप असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या
प्रत्येक नागरिकांनी जबाबदारी घ्यायला हवी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखणे हे प्रत्येकासमोर मोठे आव्हान आहे. यात आरोग्य यंत्रणा विविध स्तरावर काम करीत आहे. यामुळे कीटकजन्य आजाराची जनजागृती करण्यास अडचणी येत आहे. परंतु काम थांबलेले नाही. प्रत्येक नागरिकांनी स्वच्छता पाळल्यास, पाणी जमा होणार नाही याची खबरदारी घेतल्यास, विहीर व पाण्याच्या टाकीमध्ये गप्पी मासे सोडल्यास व आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळल्यास कीटकजन्य आजारास काही प्रमाणात दूर ठेवणे शक्य आहे.
डॉ. राहुल गायकवाड,
जिल्हा हिवताप अधिकारी, नागपूर