नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रहार, हॉस्पिटलमध्ये बेड्स फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 07:00 AM2021-03-24T07:00:00+5:302021-03-24T07:00:19+5:30

Nagpur news सप्टेंबरनंतर पुन्हा एकदा नागपूर जिल्ह्यात कोरोनाने हलकल्लोळ माजवला आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ३२ हजार रुग्ण सक्रिय आहेत. ज्या प्रमाणे रोज संक्रमितांचा आकडा वाढतो आहे, त्याप्रमाणे येत्या काळात स्थिती विदारक होण्याची शक्यता आहे.

Corona strikes in Nagpur district, hospital beds full | नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रहार, हॉस्पिटलमध्ये बेड्स फुल्ल

नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रहार, हॉस्पिटलमध्ये बेड्स फुल्ल

googlenewsNext
ठळक मुद्दे सात हजार रुग्ण विविध हॉस्पिटल्समध्ये घेत आहेत उपचारमनपाचा दावा, ८६५ बेड्स रिकामे

राजीव सिंह

 लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सप्टेंबरनंतर पुन्हा एकदा नागपूर जिल्ह्यात कोरोनाने हलकल्लोळ माजवला आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ३२ हजार रुग्ण सक्रिय आहेत. ज्या प्रमाणे रोज संक्रमितांचा आकडा वाढतो आहे, त्याप्रमाणे येत्या काळात स्थिती विदारक होण्याची शक्यता आहे. नागपूर शहर व जिल्ह्यात जवळपास ७ हजार रुग्ण विविध हॉस्पिटल्स व कोविड केअर सेंटर्समध्ये भरती आहेत. मेडिकल हब म्हणून ओळख असलेल्या नागपुरात वैद्यकीय स्थिती अतिशय बिकट झाली आहे. बेड मिळविण्यासाठी संक्रमितांना भटकावे लागत आहे. ग्रामीण भागात बेड उपलब्ध नसल्याच्या स्थितीत रुग्ण शहराकडे धाव घेत आहे. मात्र, मनपा प्रशासनाच्या दाव्यानुसार शहरातील खासगी व सरकारी इस्पितळांमध्ये ८६५ बेड्स मंगळवारी सकळापर्यंत रिकामे होते.

शहरात सप्टेंबरमध्ये जेथे ६६ इस्पितळांमध्ये कोरोना रुग्णांना भरती केले जात होते, तेथे आता ७७ इस्पितळांमध्ये कोरोना संक्रमितांवर उपचार सुरू आहेत. खासगी व सरकारी मिळून सात हजारांपेक्षा अधिक बेड्स नागपूर शहर व नजीकच्या क्षेत्रात उपलब्ध आहेत. मनपा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार नागपूर शहरातील खासगी हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनचे ३५९, आयसीयू बेड्स ९४ आणि व्हेंटिलेटरचे ५६ बेड्स रिकामे आहेत तर शासकीय इस्पितळांमध्ये ऑक्सिजनचे ५५४, आयसीयू बेड्स ६७ आणि व्हेंटिलेटरचे ९४ बेड्स आहेत. मात्र, जेव्हा मध्यमवर्गीय कुटुंबातील संक्रमित रुग्ण खासगी हॉस्पिटलमध्ये भरती होण्यास जात आहे, तेव्हा त्याला बेड उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. यावरून पुन्हा एकदा खासगी हॉस्पिटल्समध्ये दलाल सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. १६ हजार ते २५ हजार रुपये प्रतिदिवस उपचार शुल्क रुग्णांकडून वसूल केल्या जात आहे. आयसीयू बेडसाठी अतिरिक्त ९ हजार रुपये घेतले जात आहेत. यात वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क समाविष्ट असतात.

शासकीय इस्पितळे फुल्ल

संक्रमणाच्या वेगामुळे मेयो व मेडिकल फुल्ल होण्याच्या स्थितीत आहेत. ६००-६०० बेडची क्षमता असलेल्या कोविड केअर सेंटर असलेल्या मेयोमध्ये ४३५, मेडिकलमध्ये ४२३ रुग्ण भरती आहेत. परंतु, कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे येथे रुग्णांना अपेक्षित आरोग्य सुविधा प्राप्त होत नसल्याचे दिसून येते. एम्स दीर्घकाळापासून फुल्ल आहे. येथे ६० बेड्स आहेत आणि सर्व बेड्सवर रुग्ण आहेत. मनपाच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये ७० रुग्ण भरती आहेत तर १३ ऑक्सिजन बेड रिकामे आहेत. आयसोलेशनमध्ये १४ रुग्ण भरती आहेत. येथे ऑक्सिजनचे २ बेड रिकामे आहेत. लता मंगेशकर हिंगणा येथे १५१ रुग्ण भरती आहेत. येथे केवळ ६ बेड रिकामे आहेत. लता मंगेशकर हॉस्पिटल सीताबर्डी येथे ऑक्सिजनचे १७ व आयसीयूचे ३ बेड रिकामे आहेत.

राेज घेतला जातोय आढावा, स्थिती नियंत्रणात - शर्मा

सप्टेंबरच्या तुलनेत वर्तमानात खासगी हॉस्पिटल्सकडून सहकार्य मिळत असल्याचे मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी सांगितले. हॉस्पिटल्स स्वत:च पुढाकार घेऊन बेड्सची संख्या वाढवत आहेत. शहरात ६ हजारच्या जवळपास बेड्स खासगी व शासकीय हॉस्पिटल्समध्ये कोरोना रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. यातील ८०० पेक्षा अधिक बेड रिकामे आहेत. शालिनीताई मेघे हॉस्पिटलमध्ये २५० बेड उपलब्ध झाले आहेत. रोज बैठका घेतल्या जात आहेत. आढावा घेतला जात आहे. त्यामुळे, स्थिती नियंत्रणात आहे. ज्यांना बेडची गरज आहे, ते नियंत्रण कक्षाशी संपर्क साधू शकतात, असे जलज शर्मा म्हणाले.

नागपूर जिल्ह्याची स्थिती

सक्रिय रुग्ण - ३१,९९३

होम आयसोलेशन - २५,०४२

भरती रुग्ण - ६,९५१

खासगी हॉस्पिटल्स - ७७

शहरात रिकामे बेड - ८६५

..................

Web Title: Corona strikes in Nagpur district, hospital beds full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.