कोरोना : नागपुरातील लक्ष्मीनगर व धरमपेठ भागातील १८,७०४ घरांचा सर्व्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 12:56 AM2020-03-24T00:56:05+5:302020-03-24T00:58:06+5:30
नागपूर शहरात चार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले, या चारही व्यक्ती धरमपेठ आणि लक्ष्मीनगर झोनअंतर्गत येणाऱ्या परिसरात राहणाऱ्या आहेत.या व्यक्ती विदेशातून आल्यानंतर त्यांच्या संपर्कात कोण कोण आलेत, याचा शोध घेतला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात चार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले, या चारही व्यक्ती धरमपेठ आणि लक्ष्मीनगर झोनअंतर्गत येणाऱ्या परिसरात राहणाऱ्या आहेत. या व्यक्ती विदेशातून आल्यानंतर त्यांच्या संपर्कात कोण कोण आलेत, याचा शोध घेतला जात आहे. अशा व्यक्तींशी मनपाच्या आरोग्य विभागाने संपर्क साधला असून, त्यांना 'होम क्वारंटाईन' करण्यात आले आहे. परंतु मागील काही दिवसात या व्यक्तींच्या संपर्कात अनेक जण आल्याची शक्यता विचारात घेता, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी धरमपेठ व लक्ष्मीनगर झोन परिसरात घरोघरी सर्व्हे करून माहिती संकलित करण्याचे आरोग्य विभागाला तातडीने निर्देश दिले होते. त्यानुसार सोमवारपर्यंत १८ हजार ७०४ घरांचा सर्व्हे करण्यात आला.
मनपाचे सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार यांनी दिलेल्या माहितीनुसार, धरमपेठ आणि लक्ष्मीनगर झोनमध्ये घरोघरी केलेल्या सर्व्हेमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या २२९ चमूंकडून तपासणी करण्यात आली. एका चमूमध्ये दोन व्यक्ती असून, ते घरोघरी जाऊन माहिती घेत आहेत. कुणी विदेशातून आले आहे का, याचीही माहिती या सर्व्हेक्षणादरम्यान घेण्यात येत आहे. या सर्व्हेक्षणादरम्यान ज्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसतील, त्यांना होम क्वारंटाईन केले जात आहे.
उच्चभ्रूंकडून सर्व्हेला सहकार्य नाही
‘कोरोना’चा प्रादुर्भाव शहरात वाढू नये म्हणून लक्ष्मीनगर व धरमपेठ झोन क्षेत्रात प्रत्येक घराचा सर्व्हे केला जात आहे. या सर्व्हेत घरोघरी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची माहिती घेऊन सतर्कता आणि खबरदारीच्या सूचनाही केल्या जात आहेत. मोहिमेत मनपाच्या मलेरिया, फायलेरिया व अन्य विभागातील ३५२ कर्मचाºयांचा समावेश आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व्हेक्षणाचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. परंतु काही स्वत:ला उच्चभ्रू समजणारे या सर्व्हेतील कर्मचाºयांना अपेक्षित सहकार्य करीत नसल्याचे पुढे आले आहे. अशा लोकांपासून समाजाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पथकाला सहकार्य करण्याची गरज आहे.
कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी पुढाकार घ्या!
कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनासह संपूर्ण आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. साथीला वैद्यकीय क्षेत्रातील सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यानी यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा दिवस-रात्र काम करीत आहे. काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. तरीही भविष्यात गंभीर परिस्थिती उद्भवली तर आरोग्य यंत्रणाही तोकडी पडण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता यापूर्वी निमलष्करी दल, सैनिकी सेवा, शासकीय आरोग्य सेवा, मनपा आरोग्य सेवा आदी ठिकाणी सेवा देऊन सेवानिवृत्त झालेले वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, डीएमएलटी असलेले व्यक्ती आदींनी स्वत: पुढाकार घेऊन कोरोनाशी एकत्रितपणे लढा देण्यासाठी आरोग्य सेवा द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सेवा देण्यास इच्छुक आहेत, त्यांनी मनपाचे सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार यांच्याशी ९८२२५६९२१३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.