कोरोना संशयित रुग्ण मेडिकलमध्ये दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 12:38 AM2020-01-31T00:38:24+5:302020-01-31T00:40:31+5:30
चीनसह सर्वच ठिकाणी दहशत माजविलेल्या कोरोना व्हायरसने भारतातही प्रवेश केला आहे. केरळमध्ये या विषाणूच्या पहिल्या रुग्णांची नोंद झाली आहे तर, नागपुरातील मेडिकलमध्ये पहिल्या संशयित रुग्ण दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चीनसह सर्वच ठिकाणी दहशत माजविलेल्या कोरोना व्हायरसने भारतातही प्रवेश केला आहे. केरळमध्ये या विषाणूच्या पहिल्या रुग्णांची नोंद झाली आहे तर, नागपुरातील मेडिकलमध्ये पहिल्या संशयित रुग्ण दाखल झाला आहे. त्याचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविले आहे. मेडिकलने या रोगाच्या संशयित रुग्णांसाठी वॉर्ड क्र. २५ मध्ये सात खाटा राखीव ठेवल्या आहेत.
कोरोना व्हायरस सध्या जगात सर्वत्र चर्चेत आहे. चीनमधील वूआंग प्रांतात गेल्या काही आठवड्यांमध्ये हा साधारण विषाणू अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे. याच देशात २७ डिसेंबर रोजी नागपुरातील जरीपटका येथील ३५ वर्षीय युवक व्यवसायासाठी गेला. हा युवक ६ जानेवारीला भारतात परतला. नागपुरात त्याला २७ जानेवारीपासून सर्दी आणि खोकल्याचा त्रास सुरू झाला. कोरोना व्हायरस तर नसावा या शंकेपोटी पुणे आरोग्य विभागाला स्वत:च्या आरोग्याची माहिती दिली. संबंधित विभागाने नागपूरच्या आरोग्य विभागाला सूचना केल्या. येथील उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी तातडीने रुग्णाशी संपर्क साधला. मेडिकल प्रशासनाने गुरुवारी वॉर्ड क्र. २५ मध्ये दाखल करून घेतले.
व्हेंटिलेटरसह इतरही सोयी उपलब्ध
मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, संबंधित संशयित रुग्ण दाखल होताच घशाचे व रक्ताचे नमुने पुण्याच्या ‘एनआयव्ही’ प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. अशा संशयित रुग्णांसाठी वॉर्ड क्र. २५ मध्ये सात खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. गरज वाटल्यास हा ३० खाटांचा वॉर्डही पूर्णत: राखीव करण्यात येईल. येथे व्हेंटिलेटरसह आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
कोरोना व्हायरससाठी समिती स्थापन
कोरोना व्हायरससाठी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या मार्गदर्शनात पाच सदस्यांची समिती तयार करण्यात आली आहे. यात नोडल अधिकारी म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांच्यासह औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गोसावी, मायक्रोबायलॉजीच्या डॉ. वंदना अग्रवाल, ईएनटी विभागाचे प्रमुख डॉ. ए.झेड. नितनवरे व पीएसएम विभागाचे प्रमुख डॉ. उदय नारलावार आदींचा समावेश आहे. संशयित रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.
डॉ. अविनाश गावंडे
वैद्यकीय अधीक्षक
२८ दिवसांपर्यंत पाठपुरावा
दाखल झालेल्या संशयित रुग्णाचे नमुने पॉझिटीव्ह किंवा निगेटीव्ह आले तरी पुढील २८ दिवसापर्यंत पाठपुरावा केला जाईल. दिवसातून दोनवेळा दूरध्वनीद्वारे आरोग्याची माहिती घेतली जाईल.
डॉ. संजय जयस्वाल
उपसंचालक, आरोग्य सेवा विभाग