तपासणी केंद्रातील लेटलतिफीमुळे ‘कोरोना’ संशयितांना मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 10:32 AM2021-02-25T10:32:25+5:302021-02-25T10:33:37+5:30
Nagpur News नागपुरात प्रशासनाचे तपासणी केंद्र वेळेवर उघडत नसल्याने त्यांना बरीच प्रतीक्षा करावी लागत आहे. अशामुळे गर्दी वाढत असून ‘कोरोना’चा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’चा संसर्ग परत वाढत असल्याने संशयितांना तातडीने तपासणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र तपासणी केंद्रांवर गेल्यानंतर संशयितांना नाहक मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाचे तपासणी केंद्र वेळेवर उघडत नसल्याने त्यांना बरीच प्रतीक्षा करावी लागत आहे. अशामुळे गर्दी वाढत असून ‘कोरोना’चा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
‘कोरोना’च्या तपासणी केंद्रांच्या उघडण्याची नियोजित वेळ सकाळी १०.३० ही आहे. मात्र अनेक केंद्र दुपारी १२ च्या अगोदर उघडतच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ‘कोरोना’ संशयितांना तपासणीसाठी दीड ते दोन तास उभे रहावे लागत आहे. अशा स्थितीत संसर्ग होण्याचा धोका वाढण्याची शक्यता आहे.
राजनगर येथील पीडब्लूडी कॉलनी स्थित ‘कोरोना’ तपासणी केंद्राची पाहणी केली असता अनेकांनी लेटलतिफीबाबत तक्रार केली. अनेक जण सकाळी १०.३० च्या अगोदरच केंद्रावर पोहोचले होते. मात्र केंद्रच उघडले नसल्याने त्यांना प्रतीक्षा करावी लागली. यादरम्यान इतर संशयितांचीदेखील गर्दी वाढली व सुरक्षित अंतर राखणे कठीण झाले. जवळपास १२ वाजता केंद्र उघडले. मध्य नागपुरातील एका ‘कोरोना’ तपासणी केंद्रावरदेखील असेच चित्र होते.