कोरोनाने उद्योग व व्यावसायिकांना दिले नैतिकता जपण्याचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:10 AM2020-12-30T04:10:51+5:302020-12-30T04:10:51+5:30

हिंगणा एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे चंद्रशेखर शेगावकर म्हणाले, कोरोना काळात बंद असलेल्या उद्योगांना बँकांच्या २० टक्के कर्जपुरवठ्यामुळे चालना मिळाली आहे. ...

Corona taught ethics to industry and professionals | कोरोनाने उद्योग व व्यावसायिकांना दिले नैतिकता जपण्याचे धडे

कोरोनाने उद्योग व व्यावसायिकांना दिले नैतिकता जपण्याचे धडे

googlenewsNext

हिंगणा एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे चंद्रशेखर शेगावकर म्हणाले, कोरोना काळात बंद असलेल्या उद्योगांना बँकांच्या २० टक्के कर्जपुरवठ्यामुळे चालना मिळाली आहे. सहा महिन्यांपूर्वी मिळालेले कर्ज केव्हाच संपले आहे. सध्या खेळत्या भांडवलाची टंचाई आहे. हिंगणा एमआयडीसी क्षेत्रात जवळपास ७०० उद्योग सुरू असून कामगार कामावर परतले आहेत. गेल्या महिन्यापासून कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने ऑर्डरची पूर्तता करणे कठीण झाले आहे. फिनिश मालाचे दर वाढविता येत नाहीत. याचा लघु व मध्यम उद्योगांना फटका बसला आहे. कॉर्पोरेट आणि पीयूसी कंपन्यांकडून वेळेत मालाचे पैसे मिळाले नाहीत. याकरिता नियंत्रण प्राधिकरण स्थापन करावे.

बँकांतर्फे पत पाहून कर्जपुरवठा ()

बुटीबोरी इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष सीए मिलिंद कानडे म्हणाले, उद्योगाची पत पाहून बँकांनी कर्जपुरवठा केल्यामुळे उद्योगांना नवसंजीवनी मिळाली. १ जुलैपासून बुटीबोरीत ६०० पेक्षा जास्त उद्योग सुरू आहेत. एकाचे रॉ मटेरियल तर दुसऱ्याच्या त्या फिनिश वस्तू असतात. पण आता कच्च्या मालाचे दर वाढल्याने उद्योजक संकटात आहेत. कोरोनाने सर्व उद्योजकांना उद्योग चालविणे शिकविले आहे. लघु व मध्यम उद्योग तग धरून आहेत, तर कर्ज जास्त असलेले मोठे उद्योग बुडाले आहेत. कारखानदारांना नैतिकता जपून उद्योग सुरू ठेवणे कोरोनाने शिकविले. पुढील वर्षात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

किराणा व्यावसायिकांना फटका ()

नागपूर चिल्लर किराणा असोसिएशनचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख म्हणाले, लग्नसमारंभ आणि मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन नसल्याने तसेच वाढत्या महागाईने चिल्लर किराणा व्यवसायावरील संकट अजूनही कमी झालेले नाही. लोक तंतोतंत खरेदी करीत आहेत. लोकांचे जीवनचक्र सुरळीत झाल्याशिवाय या व्यवसायाला सुगीचे दिवस येणार नाहीत. लोकांमध्ये कोरोनाचा भीती नाही, पण लस आल्याशिवाय सर्वकाही सुरळीत होणे शक्य नाही. व्यावसायिकांना राज्य शासनाची मदत मिळाली नाही.

हॉटेल व्यवसाय मंदीत ()

नागपूर रेसिडेन्शियल हॉटेल्स असोसिएशनचे अध्यक्ष तेजिंदरसिंग रेणू म्हणाले, कोरोनाच्या मंदीतून हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसाय अजूनही बाहेर आलेले नाही. बाहेरील प्रवासी येत नसल्याने हॉटेलमध्ये केवळ १० ते २० टक्के खोल्या बुक आहेत. कमाई होत नाही आणि खर्चही निघत नाही. कर्मचारी व विजेचे खर्च पूर्वीसारखेच आहेत. लग्नातील उपस्थितीवर बंधने असल्याने हॉटेलचे हॉल रिकामे आहेत. देखरेख खर्च तेवढाच आहे. कोरोना काळात झालेले नुकसान कधीही भरून निघणार नाही. लस येणार नाही, तोपर्यंत या उद्योगात मंदीच राहणार आहे. आता वर्षाच्या अखेरीस शासनाच्या नियमांमुळे रेस्टॉरंटचालक त्रस्त आहेत.

-तर उद्योगात येणारा उत्साह ()

बुटीबोरी इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाने उद्योगांना नियमित मदत केल्याशिवाय या क्षेत्रात सुगीचे दिवस येणार नाहीत. बुटीबोरीत पूर्वी तीन महिने बंद असलेले उद्योग आता ९५ टक्के सुरू आहेत. पण कच्च्या मालाच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्याने लघु उद्योग केव्हाही बंद होऊ शकतात. तीन महिने जुने कंत्राट पूर्ण करण्याची उद्योजकांना चिंता आहे. कोरोना महामारीच्या सावटातून उद्योग अजूनही सावरलेले नाहीत. नवीन वर्षात सकारात्मक परिणामांमुळेच उद्योग तग धरतील.

बँकांची सकारात्मक भूमिका फायद्याची ()

बँक ऑफ महाराष्ट्रचे उपमहाव्यवस्थापक मनोज करे म्हणाले, रिझर्व्ह बँकेचे मोरॅटोरियम आणि उद्योगांना खेळत्या भांडवलावर केलेल्या कर्ज पुरवठ्यात सर्वच बँकांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. उद्योग व व्यवसायाला नवीन उभारी मिळण्यास कर्ज फायद्याचे ठरले. ईएमआयमध्येही बँकांनी मदत केली आहे. त्यामुळे उद्योग-व्यवसाय तग धरू शकले. शिवाय उद्योगांची आर्थिक स्थिती सुधारली. कोरोना काळात डिजिटल व्यवहाराला मोठ्या प्रमाणात वाव मिळाला.

कळमेश्वरमध्ये ९० उद्योग सुरू ()

कळमेश्वर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अमर मोहिते म्हणाले, कोरोना काळात बंद उद्योग सुरू झाले आहेत. सध्या ९० उद्योग सुरू आहेत. कामगार कामावर परतले आहेत. पण कच्च्या मालाचे दर दीडपट वाढल्याने उद्योजक संकटात आहेत. याशिवाय ग्रामपंचायत कर आणि अन्य कराचा भार असल्याने उद्योग चालविणे कठीण झाले आहे. कोरोना महामारीच्या संकटातून उद्योगांना बाहेर निघण्यास आणखी काही महिने लागतील.

सराफा व्यवसायात अनिश्चितता ()

नागपूर सराफा असोसिएशनचे सचिव राजेश रोकडे म्हणाले, कोरोनामुळे सराफा व्यवसायात अनिश्चितता आली आहे. १० मार्चला ३८ हजार असलेले सोन्याचे दर आता ५० हजारांवर आहेत. लस येणार असल्याने भाव कमी झाले होते, पण त्याचाही परिणाम आता फारसा दिसत नाही. आंतरराष्ट्रीय स्तराचा परिणाम देशांतर्गत स्थानिक बाजारात दिसून येतो. आता भाव कितीही असो, लोकांची खरेदी वाढली आहे. ही मोठी बाजारपेठ आहे, मागणी नेहमीच राहणार आहे. कोरोनाचा धाक नाही, पण आयुष्यभर दैनंदिन जीवनात नियम पाळावे लागतील.

ऑटोमोबाईल क्षेत्रात १२ टक्के घसरण ()

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनचे (फाडा) विभागीय संचालक अचल गांधी म्हणाले, कोरोना महामारीचा ऑटोमोबाईल क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. पूर्वी चार महिने उत्पादन आणि शोरूम बंद होते. त्यामुळे विक्रीच झाली नाही. शिवाय महाविद्यालय बंद असल्याने विक्रीवर परिणाम झाला. केवळ दसरा-दिवाळी सणांमध्ये विक्री झाली. पण गेल्यावर्षीच्या तुलनेत दुचाकी आणि चारचाकीची विक्री १० ते १२ टक्के कमी झाली. प्रवासी गाड्यांची विक्री चांगली होती. उत्पादन कमी असल्याने गाड्यांची दोन महिन्यांपर्यंत वेटिंग आहे. कोरोना काळात कृषी क्षेत्राला प्रोत्साहन मिळाल्याने ट्रॅक्टर विक्री सर्वाधिक झाली. पुढील वर्षी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

बांधकाम क्षेत्राला कोरोना काळ संकटाचा ()

क्रेडाई नागपूर मेट्रोचे अध्यक्ष महेश साधवानी म्हणाले, बांधकाम क्षेत्रासाठी कोरोना काळ संकटाचा होता. त्यात काळात कामगार नसल्याने सर्वच प्रकल्पातील कामे ठप्प होती. असोसिएशनच्या मागणीनंतर राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात ३ टक्के सवलत दिल्याने तीन वर्षापासून मंदीतील या क्षेत्राला नवसंजीवनी दिली. आता जुने प्रकल्प पूर्णत्वास येत असून रजिस्ट्री वाढल्या आहेत. पुढील तीन महिने २ टक्के मुद्रांक शुल्कात सवलत असल्याने रजिस्ट्री वाढणार आहेत. पण कच्च्या मालाचे दर वाढल्याने बिल्डर्स त्रस्त आहे. यावर नियंत्रण आणण्याची क्रेडाईची मागणी आहे.

Web Title: Corona taught ethics to industry and professionals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.