विनाकारण फिरणाऱ्या ७९१४ नागरिकांची कोरोना टेस्ट()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:08 AM2021-05-18T04:08:30+5:302021-05-18T04:08:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणाला आळा बसावा, यासाठी शहर पोलीस आणि मनपाच्या वैद्यकीय आरोग्य विभागातर्फे विनाकारण रस्त्यावर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाला आळा बसावा, यासाठी शहर पोलीस आणि मनपाच्या वैद्यकीय आरोग्य विभागातर्फे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना अँटिजन चाचणी सुरू करण्यात आली आहे. या संयुक्त मोहिमेत महिनाभरात ७९१४ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी २३८ कोरोनाबाधित निघाले. कोरोनाबाधितांना तत्काळ घरी जाऊन डॉक्टर्ससोबत संपर्क करण्याचा सल्ला देण्यात आला.
कोरोना साखळी खंडित करण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार मनपातर्फे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. विनाकामाने फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई होत आहे. मनपाची आरोग्य यंत्रणा ११ ठिकाणी पोलिसांसोबत नागरिकांची कोरोना चाचणी करीत आहे. राणाप्रतापनगर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मानेवाडा चौक, खापरी नाका चौक, दिघोरी नाका चौक, मेयो रुग्णालय चौक, पारडी नाका चौक, ऑटोमोटिव्ह चौक, साई मंदिर चौक (जुनी कामठी), जुना काटोल नाका चौक आणि नवीन काटोल नाका चौक येथे चाचणी करण्यात आली. कोरोना चाचणीमुळे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर आळा बसला आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांचा मार्गदर्शनात डॉ. शुभम मनगटे आणि आरोग्य यंत्रणेची चमू ही चाचणी करीत आहे. या कामात झोनल वैद्यकीय अधिकारी व सहायक आयुक्त यांचे सहकार्य मिळत आहे.