नागपुरातील पत्रकारांची होणार कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 12:44 AM2020-04-21T00:44:21+5:302020-04-21T00:45:27+5:30
मुंबई येथील ५३ पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने प्रसारमाध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिनिधींना कोविड-१९चा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरातील पत्रकारांसाठी कोरोनाची विशेष चाचणी घेण्याचा पुढाकार महापौर संदीप जोशी यांनी घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई येथील ५३ पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने प्रसारमाध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिनिधींना कोविड-१९चा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरातील पत्रकारांसाठी कोरोनाची विशेष चाचणी घेण्याचा पुढाकार महापौर संदीप जोशी यांनी घेतला आहे.
शहरातील इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या प्रतिनिधींची कोरोना चाचणी २१ आणि २२ एप्रिलला इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात घेण्यात येणार आहे. मंगळवारी २१ एप्रिलला इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींची सकाळी ९.३० वाजता तर बुधवारी २२ एप्रिलला प्रिंट मीडियाच्या फिल्डवर काम करणाऱ्या प्रतिनिधींची चाचणीही सकाळी ९.३० वाजतापासून करण्यात येणार आहे.
नागरिकांपर्यंत अचूक माहिती पोहोचविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियातील पत्रकार दिवसरात्र कार्य करीत आहेत. अशा स्थितीत त्यांनाही कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. पत्रकारांच्या परिवाराच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांची चाचणी होणे आवश्यक आहे. यासाठी इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या फिल्डवर काम करणाऱ्या प्रतिनिधींनी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (मेयो हॉस्पिटल) जाऊन ही चाचणी करून घ्यावी, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.