व्यापारी व कर्मचाऱ्यांना १८ ऑगस्टपर्यंत कोरोना टेस्ट बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 10:00 PM2020-08-12T22:00:58+5:302020-08-12T22:23:25+5:30
मनपाने नागपुरातील सर्व दुकानदार आणि तिथे कार्यरत कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी १८ ऑगस्टपर्यंत बंधनकारक केली आहे. १८ ऑगस्टनंतर दुकानदाराकडे कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र नसल्यास दुकाने बंद करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपाने नागपुरातील सर्व दुकानदार आणि तिथे कार्यरत कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी १८ ऑगस्टपर्यंत बंधनकारक केली आहे. १८ ऑगस्टनंतर दुकानदाराकडे कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र नसल्यास दुकाने बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व दुकानदारांनी स्वत:ची आणि कार्यरत कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करावी, असे आवाहन नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे (एनव्हीसीसी) अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी पत्रपरिषदेत केले. एनव्हीसीसी विदर्भातील १३ लाख व्यापाऱ्यांची संघटना आहे, हे विशेष.
नागपुरात कोरोनाचे रुग्ण वाढत असून मृत्यूची संख्याही वाढली आहे. बाजारपेठांमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना वाढल्याचा मनपाला संशय आहे. त्या धर्तीवर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील सर्व दुकाने आणि प्रतिष्ठानांचे मालक व कार्यरत कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. १८ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर मनपा अधिकाऱ्यांतर्फे आकस्मिक तपासणी करून चाचणीचे प्रमाणपत्र नसलेल्यांची दुकाने बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व दुकानदार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. याकरिता मनपाने चार दिवसांपूर्वी नागपुरात झोननुसार २२ चाचणी सेंटर सुरू केले आहे. याशिवाय सर्व खासगी लॅबमध्ये परवडणाऱ्या किमतीत रॅपिड टेस्ट करता येईल. चाचण्या वाढल्याने फायदाच होईल, असे मेहाडिया यांनी स्पष्ट केले.
कोरोना संसर्ग वाढू नये, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. याकरिता व्यापाऱ्यांनीही सहकार्य करणे आवश्यक आहे. नागपुरात जवळपास ३० हजार दुकाने असून त्याकडे असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या पाहता ७० ते ८० हजार कोरोना चाचणी होणार आहे. मनपाने चार दिवसांपूर्वी आदेश काढला आहे. पाच दिवसात एवढ्या चाचण्या होणार नाहीत. कदाचित मनपा वेळ वाढवून देईल, पण व्यापाऱ्यांनी चाचण्या तातडीने करण्याची गरज आहे. मनपाचे अधिकारी दुकानात आल्यानंतर प्रमाणपत्र मागितल्यानंतर आणि दुकान बंद केल्यानंतर व्यापारी चाचणीकरिता धावाधाव करतील. पण त्यापूर्वीच कोरोना चाचणी करावी, असे आवाहन मेहाडिया यांनी केले. अशा प्रकारच्या चाचण्या पुणे आणि औरंगाबाद येथे सुरू असून तिथे रुग्णांची संख्या कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.
एका प्रश्नाच्या उत्तरात मेहाडिया म्हणाले, शहरात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतरच ऑड-इव्हन पद्धतीवर विचार करण्याचे आश्वासन मनपा आयुक्तांनी दिले आहे. दुकानदारांना मनपाने परवाना घेण्याच्या संदर्भात ते म्हणाले, मनपाच्या कायद्यांतर्गत ज्वलंतशील पदार्थांची विक्री करणाºया दुकानदारांना परवाना घेणे बंधनकारक आहे. चेंबरतर्फे कायद्यातील तरतुदी तपासून मनपा आयुक्तांना विस्तृत निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतर स्थिती स्पष्ट होईल.
पत्रपरिषदेत रामअवतार तोतला, संजय अग्रवाल, राजू माखिजा, फारुखभाई अकबानी, सचिन पुनियानी उपस्थित होते.