लसीकरण केंद्रावर कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:08 AM2021-04-27T04:08:05+5:302021-04-27T04:08:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : हनुमाननगर झोन क्षेत्रातील शारदा चौक येथील दुर्गानगर शाळेत ५ एप्रिलपासून लसीकरण केंद्र सुरू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हनुमाननगर झोन क्षेत्रातील शारदा चौक येथील दुर्गानगर शाळेत ५ एप्रिलपासून लसीकरण केंद्र सुरू आहे. लस उपलब्ध नसल्यास केंद्र बंद ठेवले जाते. झोन प्रशासनाने सोमवारी याच ठिकाणी ॲन्टिजेन टेस्ट सेंटर सुरू केले, जे आरोग्य कर्मचारी लसीकरण करत होते. त्यांनाच ॲन्टिजेन टेस्ट करण्याच्या कामाला लावले. एकाच ठिकाणी लसीकरण केंद्र व कोरोना चाचणी केंद्र सुरू केल्याने संक्रमणाचा धोका निर्माण झाला.
याची माहिती मिळताच प्रभागाच्या नगरसेविका रूपाली ठाकूर यांनी याला विरोध दर्शविला. त्यांनी चाचणी केंद्र खानखोजेनगर येथील महाकाली मंदिराच्या शेडमध्ये सुरू करण्याची सूचना केली होती. मात्र अधिकाऱ्यांनी दुर्गानगर शाळेत चाचणी केंद्र सुरू केल्याचा आरोप ठाकूर यांनी केला आहे.
वास्तविक महाकाली मंदिर येथे चाचणी केंद्रासाठी जागा सुचविल्यानंतर त्यानुसार नागरिकांना वेळ देण्यात आली होती. परंतु दुपारी १ पर्यंत आरोग्य विभागाचे पथक येथे पोहोचले नाही. चाचणी केंद्रासंदर्भात महापौर दयाशंकर तिवारी यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती ठाकूर यांनी दिली. चाचणी केंद्राला नागपूर भाजपा झोपडपट्टी आघाडीचे अध्यक्ष परशु ठाकूर यांनी विरोध दर्शविला आहे.
दुर्गानगर शाळेचा परिसर मोठा आहे. माेठे मैदान आहे. दोन गेट आहेत. खोल्या भरपूर आहेत. परंतु अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन न करता चाचणी केंद्र सुरू केल्याची माहिती आहे.