आरोग्य कर्मचाऱ्यांचे उद्यापासून कोरोना लसीकरण ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:09 AM2021-01-15T04:09:10+5:302021-01-15T04:09:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शनिवारी १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात होत आहे. यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शनिवारी १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात होत आहे. यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. नागपूर जिल्ह्यासाठी तब्बल ४२ हजार कोरोना डोस उपलब्ध झाले आहेत. विविध केंद्रांवर ते वितरित करण्यात आले आहेत. नागपूर शहरातील २५ हजार १६४ तर नागपूर ग्रामीण भागातील ९ हजार १६९ अशा ३४ हजार ३३३ आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असून त्यांना ही लस देण्यात येणार आहे.
बुधवारी मध्यरात्री रेफ्रिजरेटर कंटेनर घेऊन कोरोनाचे डोस नागपुरात पोहोचले. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांसाठी तब्बल १ लाख १४ हजार लसींचे डोस यात हाेते. हा कंटेनर अकोला येथून रात्री पावनेतीन वाजता नागपुरातील आरोग्य उपसंचालक कार्यालयात पोहोचला. येथून पहाटेच ४.१५ वाजेपर्यंत नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यात त्याचे वितरण करण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्याला ४२ हजार, गोंदिया १० हजार, भंडारा ९५००, चंद्रपूर २० हजार, गडचिरोली १२ हजार, वर्धा २०,५०० डोजेस देण्यात आले आहेत. पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटची ही वॅक्सिन असून ती आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.
बॉक्स
जिल्ह्यात १२ लसीकरण केंद्र
नागपूर जिल्ह्यात १२ केंद्र राहणार आहेत. त्यामध्ये नागपूर महानगर क्षेत्रातील पाच तर ग्रामीण क्षेत्रातील सात केंद्रांचा समावेश आहे. शहरातील पाच केंद्रांमध्ये डागा माहिला रुग्णालय, एम्स, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व महाल येथील डायग्नोसिस सेंटर येथे लसीकरण करण्यात येईल. जिल्ह्यातील केंद्रामध्ये उपजिल्हा रुग्णालय रामटेक, कामठी, ग्रामीण रुग्णालय उमरेड, हिंगणा, काटोल, सावनेर, प्राथमिक आरोग्य केंद्र, गोंडखैरीचा समावेश आहे.
बॉक्स
‘वॅक्सिन’ घेतल्यावरही आरोग्य कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी
प्रत्येक रुग्णालयात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना ही ‘वॅक्सिन’ देण्यात येणार आहे परंतु ‘वॅक्सिन’ घेतल्यानंतरही आरोग्य कर्मचाऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. कारण ‘वॅक्सिन’ लावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अँटीबॉडी तयार होत नाही. त्यामुळे ‘वॅक्सिन लावल्यानंतरही आरोग्य डॉक्टर, नर्स, व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे व हात धुणे हे कटाक्षाने सुरू ठेवावे
डॉ. संजय जायस्वाल
आरोग्य उपसंचालक, नागपूर विभाग