लहान मुलांच्या कोरोना लसीची नागपुरात ‘ट्रायल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 10:17 PM2021-05-12T22:17:41+5:302021-05-12T22:19:46+5:30

Corona vaccine trial for children कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त केला जात असून, यात लहान मुले अधिक प्रभावित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याने मागील दोन महिन्यांपासून २ ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांवरील कोरोना लसीचा मानवी चाचणीला (ट्रायल) मंजुरीची प्रतीक्षा होती. अखेर भारतीय औषध महानियंत्रकने (डीसीजीआय) ट्रायलला मंजुरी दिली असून ‘एम्स’ दिल्ली, ‘एम्स’ पाटना व नागपुरात वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांच्याकडे ही चाचणी होणार आहे.

Corona vaccine trial for children in Nagpur | लहान मुलांच्या कोरोना लसीची नागपुरात ‘ट्रायल’

लहान मुलांच्या कोरोना लसीची नागपुरात ‘ट्रायल’

Next
ठळक मुद्देडॉ. वसंत खळतकर यांच्या नेतृत्वात चाचणी : २ ते १८ वयोगटातील मुलांना दिली जाणार लस

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त केला जात असून, यात लहान मुले अधिक प्रभावित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याने मागील दोन महिन्यांपासून २ ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांवरील कोरोना लसीचा मानवी चाचणीला (ट्रायल) मंजुरीची प्रतीक्षा होती. अखेर भारतीय औषध महानियंत्रकने (डीसीजीआय) ट्रायलला मंजुरी दिली असून ‘एम्स’ दिल्ली, ‘एम्स’ पाटना व नागपुरात वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांच्याकडे ही चाचणी होणार आहे.

कोरोनाचा पहिल्या लाटेत लहान मुले व कुमारवयीन मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण फारसे नव्हते; परंतु दुसऱ्या लाटेत १९ वर्षांपर्यंतच्या वयोगटात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून आले. जानेवारी महिन्यात नागपूर जिल्ह्यात ९०३, फेब्रुवारी महिन्यात १७४१, मार्च महिन्यात ६९६६ तर एप्रिल महिन्यात २०८१० असे एकूण चार महिन्यात ३०,४२० मुले बाधित झाली. यातच कोरोना विषाणूचे होत असलेले ‘म्युटेशन’ व लसीकरणापासून दूर असलेल्या मुलांकडून कोरोना प्रतिबंधक नियमाचे योग्य पद्धतीने पालन होत नसल्याने तिसरी लाट धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दरम्यान भारत बायोटेक कंपनी २ ते १८ वर्षपर्यंतच्या मुलांवर ‘कोव्हॅक्सिन’ लसीच्या ‘ट्रायल’साठी प्रयत्नात होती. नागपुरातून डॉ. खळतकर यांनी चाचणीसाठी पुढाकार घेतला होता. मंगळवारी ‘डीसीजीआय’ परवानगी दिल्याने लवकरच चाचणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

कोव्हॅक्सिन लसीचा पहिला टप्पाही नागपुरातून

१८ वर्षांवरील ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा मानवी चाचणीचा पहिल्या टप्प्याला नागपुरातील गिल्लूरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधून सुरुवात झाली होती. दुसऱ्या टप्प्यात एका खासगी हॉस्पिटलमध्ये १५०० व्यक्तींवर याच लसीची चाचणी झाली. याशिवाय, ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चा ‘कोविशिल्ड’ लसीचा चाचणीचा तिसरा टप्पा मेडिकलमध्ये यशस्वी पार पडला. त्यानंतर आता लहान मुलांच्या मानवी चाचणीचा पहिला टप्पाही नागपुरातून सुरू होत असल्याने नागपूरच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे.

तीन आठवड्यांनंतर प्रत्यक्ष चाचणीला सुरुवात

डॉ. खळतकर म्हणाले, ‘‘डीसीजीआय’ने २ ते १८ वयोगटातील भारत बायोटेक कंपनीच्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीच्या मानवी चाचणीला मंजुरी दिली आहे. संबंधित कंपनीकडून या संदर्भातील पत्र यायचे आहे. पत्र आल्यानंतर व ‘इथिकल’ समितीकडून परवानगी मिळाल्यानंतर साधारण तीन आठवड्यात प्रत्यक्ष चाचणीला सुरुवात होईल.’

Web Title: Corona vaccine trial for children in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.