Corona virus : मेडिकलमध्ये १०० बेडचे स्वतंत्र अतिदक्षता कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 10:20 PM2020-03-23T22:20:22+5:302020-03-23T22:22:11+5:30

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी आवश्यक ती काळजी व रूपरेषा ठरविण्यासाठी सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकींचे सत्र पार पडले. यादरम्यान मेडिकलमध्ये कोरोना विषाणूबाधित रुग्णांसाठी १०० खाटांचा अतिदक्षता कक्ष तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Corona virus: 100 bed independent care room in medical | Corona virus : मेडिकलमध्ये १०० बेडचे स्वतंत्र अतिदक्षता कक्ष

Corona virus : मेडिकलमध्ये १०० बेडचे स्वतंत्र अतिदक्षता कक्ष

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी दिले १५०० खाटा आरक्षित ठेवण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी आवश्यक ती काळजी व रूपरेषा ठरविण्यासाठी सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकींचे सत्र पार पडले. यादरम्यान मेडिकलमध्ये कोरोना विषाणूबाधित रुग्णांसाठी १०० खाटांचा अतिदक्षता कक्ष तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी पालकमंत्री राऊत म्हणाले, कोरोनाला प्रतिबंध हे मानवी जातीशी विषाणूचे असलेले महायुद्ध आहे. त्यात विषाणूला हरवण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. याअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना उपचारासाठी विविध सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. यामध्ये १०० खाटांचे स्वतंत्र अतिदक्षता कक्ष प्राधान्याने पूर्ण करण्यासोबतच दीड हजार खाटा यासाठी आरक्षित ठेवण्यासंदर्भात नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयात आज सोमवारी पालकमंत्री नितीन राऊत यांनी विविध घटकांशी संवाद साधला. त्यात खासगी वैद्यकीय व्यावसायिक, उद्योजक, व्यावसायिक आणि अशासकीय संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, अपर आयुक्त अभिजित बांगर, वनराई संस्थेचे विश्वस्त गिरीश गांधी, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे सुरेश राठी, प्रताप मोटवानी, संतोष अग्रवाल, वाधवानी, नंदू गौर, अजय पाटील, कौस्तुभ चॅटर्जी, लना बुधे, रोटरी क्लबचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

खासगी डॉक्टरांना सहकार्य करण्याचे आवाहन
बैठकीत उपस्थित खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना पालकमंत्री राऊत यांनी मेडिकलमध्ये उपचारासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. डॉक्टरांनी सामाजिक भावनेने यात सहकार्य करायला हवे. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची तसेच साहित्याचीही आवश्यकता भासल्यास ती उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही केले.

स्वयंसेवी संस्थांनाही मदतीचे आवाहन
नागपुरातील महत्त्वाच्या स्वयंसेवी संस्थांनी कोरोना साथीविषयी जनजागृती व प्रचार-प्रसार करण्यासाठी काम करावे. उद्योजकांनी सॅनिटायझर, मास्क गाऊनचे उत्पादन करून पुरवठा करावा. निराधार, बेघर, आजारी व्यक्तीस मदतीचा हात द्यावा. अशा कठीण प्रसंगी सर्वांनी मिळून काम करू या, असे आवाहन त्यांनी केले. समाजातील सर्व घटकांनी यथाशक्ती सहयोग दिल्यास कोरोनाविरुद्धची लढाई आपण जिंकू शकतो, असा आशावादही पालकमंत्री राऊत यांनी व्यक्त केला.

जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई
शहरात जीवनावश्यक वस्तूंचा कोणताही तुटवडा नाही. त्यासाठी नागरिकांनी बाजारात गर्दी करू नये. जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री राऊत यांनी यावेळी प्रशासनाला दिले.

Web Title: Corona virus: 100 bed independent care room in medical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.