Corona Virus; विदर्भात रुग्णसंख्या पाच हजाराजवळ; ११३ रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 08:33 PM2020-07-02T20:33:45+5:302020-07-02T20:34:05+5:30
विदर्भात कोरोनाबाधित ११३ रुग्णांची भर पडल्याने बाधितांची संख्या ४९१९ झाली, शिवाय चार मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या १६२ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क:
नागपूर : विदर्भात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाच हजाराजवळ पोहचली आहे. गुरुवारी ११३ रुग्णांची भर पडल्याने बाधितांची संख्या ४९१९ झाली, शिवाय चार मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या १६२ झाली आहे. अकोला आणि नागपूर जिल्ह्यात आज सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. विदर्भात अकरा जिल्ह्यापैकी आठ जिल्ह्यात कमी जास्त प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत.
अकोला जिल्ह्यात आज ३९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची एकूण संख्या १६०७ झाली, तर तीन मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या ८३ वर गेली आहे. मृतांमध्ये ६५वर्षीय महिला, ४५ वर्षीय महिला व ७१ वर्षीय पुरुष आहे. जिल्ह्यात कोविड आजारातून १२०० रुग्ण बरे झाले आहेत तर ३२४ रुग्ण उपचार घेत आहेत. नागपूर जिल्ह्यात ३३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यातील १२ रुग्ण हे मध्यवर्ती कारागृहातील आहेत. रुग्णांची एकूण १६११ झाली असून मृतांची संख्या २५वर स्थिरावली आहे.
अमरावती जिल्ह्यात रुग्णांच्या वाढत्या संख्येने आरोग्य प्रशासनाची झोप उडाली आहे. आज १४ रुग्णांची भर पडली. रुग्णांची संख्या ६०६ झाली आहे. जिल्ह्यात २५ मृत्यू तर ४१० रुग्ण बरे झाले आहेत. १७१ रुग्ण उपचार घेत आहेत. पूर्व विदर्भात नागपूरनंतर गोंदिया जिल्ह्यात रुग्ण वाढताना दिसून येत आहे. येथे आज पुन्हा ११ रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची संख्या १४२ झाली आहे. जिल्ह्यात आज एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या दोन झाली. १०४ रुग्ण बरे झाले आहेत तर ३० रुग्ण उपचार घेत आहेत.
यवतमाळ जिल्ह्यात आठ रुग्ण पॉझिटिव्ह आले. गडचिरोली जिल्ह्यात पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संखा ७२, मृतांची संख्या एक तर ५८ रुग्ण बरे झाले आहेत. चंद्रपूर येथे दोन रुग्णांची नोंद झाली. रुग्णसंख्या ९८ झाली असून ५४ रुग्ण बरे तर ४४ रुग्ण उपचार घेत आहेत. वर्धा जिल्ह्यात एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. रुग्णसंख्या ३८, मृतांची संख्या पाच, बरे झालेल्यांची संख्या २३ तर १० रुग्ण उपचार घेत आहेत. वाशिम, बुलढाणा जिल्ह्यात रुग्णांची संख्या स्थिर आहे.