Corona virus : नागपुरातही बार, रेस्टॉरेंट, पानठेले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 08:44 PM2020-03-18T20:44:31+5:302020-03-18T20:47:55+5:30

जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व बीअर शॉपी, वाईन शॉप, परमिट रूम बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट, सर्व क्लब, देशी दारूची दुकाने, सर्व रेस्टॉरंट व पानठेले बंद करण्याचा आदेश जारी केला आहे.

Corona virus: Bar, restaurant,Pan shops closed in Nagpur | Corona virus : नागपुरातही बार, रेस्टॉरेंट, पानठेले बंद

Corona virus : नागपुरातही बार, रेस्टॉरेंट, पानठेले बंद

Next
ठळक मुद्देजिल्हा-मनपा प्रशासनाचा स्वागतार्ह निर्णय : लोकमतच्या जनहितार्थ मोहिमेला यश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी लोकांची गर्दी कमी करणे अत्यावश्यक आहे. लोकांचा कमीत कमी संपर्क यावा व शक्यतोवर लोकांनी घरीच राहावे, यासाठी आज बुधवारी जिल्हा व मनपा प्रशासनाने स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. याअंतर्गत जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व बीअर शॉपी, वाईन शॉप, परमिट रूम बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट, सर्व क्लब, देशी दारूची दुकाने, सर्व रेस्टॉरंट व पानठेले बंद करण्याचा आदेश जारी केला आहे.


आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ आजाराबाबत नागपूर जिल्ह्यात दक्षता घेण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. जगातील इतर देशांतील अनुभव लक्षात घेता कोरोना विषाणूचा संसर्ग चक्राकार पद्धतीने पसरतो. या अनुभवाच्या आधारे विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी व्यक्तींमध्ये भौतिकदृष्ट्या कमीत कमी संपर्क यावा व शक्यतो घरात राहणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रवींद्र ठाकरे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ३० (२) (५) व (१८) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून उपरोक्त आदेश जारी केले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या धर्तीवर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनीसुद्धा शहरातील गर्दी कमी करण्यासाठी शहरातील सर्व शॉपिंग मॉल, दुकाने व आस्थापना ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. परंतु अत्यावश्यक किराणा सामान, दूध, व भाजीपाला तसेच जीवनावश्यक वस्तू व औषधालय यातून वगळण्यात आले आहेत.

लग्न समारंभ व कौटुंबिक सोहळेही टाळा
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी आदेश जारी करीत शहरातील सर्व मंगल कार्यालये, सभागृहे, बॅन्क्वेट हॉल, क्लबधारकांना असे निर्देश दिले आहेत की, लग्न कार्य किंवा कौटुंबिक कार्यक्रम शक्यतोवर रद्द करावे किंवा पुढे ढकलावे. असे लग्न व इतर कार्यक्रम अत्यावश्यक असल्यास शक्यतोवर ५० पेक्षा जास्त लोकांची गर्दी होणार नाही, याकरिता योग्य उपाययोजना कराव्यात. कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही त्याकरिता सर्व आवश्यक ती दक्षता व खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही केल्या आहेत.

हे राहणार बंद
सर्व बीअर शॉपी, वाईन शॉप, परमिट रूम, बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट, सर्व क्लब, देशी दारूची दुकाने, सर्व रेस्टॉरंट व पानठेले, शॉपिंग मॉल, दुकाने, आस्थापना आदी

हे राहणार सुरू
अत्यावश्यक किराणा सामान, दूध, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू, औषधालय

शहरात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू आहे. तेव्हा नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. आपली काळजी घ्यावी. शक्यतोवर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. जास्तीत जास्त घरीच राहावे.
रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी

नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी लग्न समारंभ व इतर कौटुंबिक समारंभ आयोजित करणे व इतरांच्या कार्यक्रमास जाणे टाळावे.
तुकाराम मुंढे, मनपा आयुक्त

शहरात जमाव बंदी कायदा लागू करण्यात आला आहे. तेव्हा लोकांनी गर्दी करू नये. शक्यतोवर घरीच राहावे. ५ पेक्षा जास्त लोक एकत्र आल्यास कारवाई होईल, तेव्हा सहकार्य करावे.
डॉ. भूषणकुमार उपाध्याय
पोलीस आयुक्त

Web Title: Corona virus: Bar, restaurant,Pan shops closed in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.