CoronaVirus in Nagpur : सहा सैनिकांसह २२ रुग्ण पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 11:41 PM2020-06-29T23:41:04+5:302020-06-29T23:43:49+5:30
सलग दुसऱ्या दिवशी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या २५ झाली आहे. यातील १३ मृत्यू एकट्या जून महिन्यातील आहेत. विशेष म्हणजे, याच महिन्यात आतापर्यंत सर्वाधिक, ९३२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात आज सहा सैनिकांसह २२ रुग्णांची भर पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सलग दुसऱ्या दिवशी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या २५ झाली आहे. यातील १३ मृत्यू एकट्या जून महिन्यातील आहेत. विशेष म्हणजे, याच महिन्यात आतापर्यंत सर्वाधिक, ९३२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात आज सहा सैनिकांसह २२ रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या १,४७२ झाली आहे. मनीषनगर व दीपकनगरात काटोल रोड येथे पहिल्यांदाच रुग्णाची नोंद झाली. ३७ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
नागपूर जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून रुग्णांची संख्या २१ वर राहिली आहे. रविवारी एका रुग्णाच्या मृत्यूनंतर आज मानकापूर येथील ५४ वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या रुग्णाला गंभीर स्वरूपातील उच्च रक्तदाब होता. एका खासगी इस्पितळात उपचार सुरू होते. १९ जून रोजी रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने मेडिकलमध्ये पाठविण्यात आले. रुग्ण व्हेंटिलेटरवर होता. उपचार सुरू असताना आज दुपारी मृत्यू झाला. आज नीरीच्या प्रयोगशाळेतून १०, एम्सच्या प्रयोगशाळेतून तीन तर मेडिकलच्या प्रयोगशाळेतून एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. मेयोच्या प्रयोगशाळेतून आठ रुग्ण पॉझिटिव्ह आले. विशेष म्हणजे, यातील सहा रुग्ण हे मिलिटरी हॉस्पिटल कामठी येथील आहेत. तर एक रुग्ण दीपकनगर काटोल रोड व एक मनीषनगर येथील आहेत.
कामठीत १२ सैनिक पॉझिटिव्ह
कामठी, उंटखाना परिसरातील सैनिक फायरिंग रेंज परिसरात आज पुन्हा सहा सैनिक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सैनिक प्रशिक्षण केंद्रात खळबळ उडाली. सहाही कोरोना पॉझिटिव्ह सैनिकांवर मिलिटरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी पॉझिटिव्ह आलेला सैनिक हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विशाखापट्टनम येथून सैनिक प्रशिक्षण आटोपून कामठी येथील उंटखाना परिसरातील फायरिंग रेंज सैनिक प्रशिक्षण केंद्रात परत आला. त्याला क्वारंटाईन करण्यात आले होते. परंतु त्यांच्या संपर्कात आलेल्या सहा सैनिकांना लागण झाली. आतापर्यंत १२ सैनिक कोरोनाबाधित झाले आहेत.
३७ रुग्णांना पाठविले घरी
मेयोमधून १० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यात नाईक तलाव-बांगलादेश, नवी शुक्रवारी, हंसापुरी, मोमिनपुरा, लालगंज, वानाडोंगरी, झिंगाबाई टाकळी, १४ मैल अमरावती रोड व अमरनगर हिंगणा येथील आहेत. एम्समधून एका रुग्णाला सुटी देण्यात आली, तर मेडिकलमधून २६ रुग्णांना सुटी देण्यात आली. यात वानाडोंगरी, अमरनगर, आनंदनगर, नाईक तलाव, प्रेमनगर, लष्करीबाग, जागृती कॉलनी व अकोला येथील रुग्ण आहेत.
नागपुरातील कोरोना स्थिती
संशयित : १९०४
अहवाल प्राप्त : २४,२०६
बाधित रुग्ण : १,४७२
घरी सोडलेले : १,१७४
मृत्यू : २५