CoronaVirus in Nagpur : आठवड्याभरात कोरोनाचे २४० रुग्ण, ८ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 10:06 PM2021-06-26T22:06:54+5:302021-06-26T22:07:33+5:30
Corona virus status कोरोना संसर्गाची तीव्रता कमी झाली आहे. आठवड्याभरात २४० रुग्ण व ८ मृत्यूची भर पडली. शनिवारी १८ रुग्ण व २ मृत्यूची नोंद झाल्याने नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,७६,९६२ तर मृतांची संख्या ९०२५वर पोहचली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संसर्गाची तीव्रता कमी झाली आहे. आठवड्याभरात २४० रुग्ण व ८ मृत्यूची भर पडली. शनिवारी १८ रुग्ण व २ मृत्यूची नोंद झाल्याने नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,७६,९६२ तर मृतांची संख्या ९०२५वर पोहचली. आज ८१ रुग्ण बरे झाले. अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी घट होऊन पहिल्यांदाच पाचशेखाली, ४७३ झाली आहे.
दुसऱ्या लाटेची सुरूवात झाल्यापासून सातत्याने रुग्ण वाढत होते. परंतु मे महिन्यापासून चित्र बदलले. जून महिन्यात झपाट्याने रुग्णसंख्येत घट आली. विशेष म्हणजे, जूनच्या पहिल्या आठवड्यात १६६७ रुग्ण व ७० मृत्यूची नोंद झाली. दुसºया आठवड्यात ७४७ रुग्ण व ५२ मृत्यू, तिसºया आठवड्यात ३७९ रुग्ण व १६ मृत्यू तर या चौथ्या आठवड्यात २४० रुग्ण व ८ मृत्यू झाले. आज नागपूर जिल्ह्यात ७४८० चाचण्या झाल्या. पॉझिटिव्हीटीचा दर आणखी कमी होऊन ०.२४ टक्क्यांवर आला आहे.
शहरात ११ तर ग्रामीणमध्ये ६ रुग्ण
शनिवारी शहरात ११ रुग्ण व १ मृत्यू, ग्रामीणमध्ये ६ रुग्ण तर जिल्हाबाहेरील १ रुग्ण व १ मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंत शहरात ३,३२,४५० रुग्ण व ५,२९५ मृत्यू झाले तर, ग्रामीणमध्ये १,४२,९०६ रुग्ण व २३०६ मृत्यू झाले आहेत. नागपूर जिल्ह्यात ४,६७,४६४ रुग्ण बरे झाले आहेत.
रुग्णालयात १५६ रुग्ण
विविध शासकीयसह खासगी रुग्णालयात सध्या १५६ रुग्ण तर होम आयसोलेशनमध्ये ३१७ रुग्ण आहेत. मेडिकलमध्ये ३८, मेयोमध्ये ८ तर एम्समध्ये ३ रुग्ण आहेत. बहुसंख्य खासगी रुग्णालयात एकही कोरोनाचा रुग्ण नाही.
आठवड्याची स्थिती
पहिला आठवडा : १६६७ रुग्ण : ७० मृत्यू
दुसरा आठवडा : ७४७ रुग्ण : ५२ मृत्यू
तिसरा आठवडा : ३७९ रुग्ण : १६ मृत्यू
चौथा आठवडा : २४० रुग्ण : ८ मृत्यू
कोरोनाची शनिवारची स्थिती
दैनिक चाचण्या: ७४८०
शहर : ११ रुग्ण व १ मृत्यू
ग्रामीण : ६ रुग्ण व ० मृत्यू
ए. बाधित रुग्ण :४,७६,९६२
ए. सक्रिय रुग्ण : ४७३
ए. बरे झालेले रुग्ण : ४,६७,४६४
ए. मृत्यू : ९०२५