CoronaVirus in Nagpur : नागपुरात आणखी ४२ रुग्ण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 10:56 PM2020-06-09T22:56:49+5:302020-06-09T22:58:20+5:30
‘मिशन बिगीन’च्या तिसऱ्या टप्प्यात रस्त्यावर, दुकानात, कार्यालयात वर्दळ वाढली असताना दुसरीकडे रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. गेल्या पाच दिवसांत १५४ रुग्णांची नोंद झाली आहे. यात आज ४२ रुग्णांची भर पडली. या रुग्णांसह नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या ७८१ वर पोहचली आहे. मार्टिननगर, शिवाजीनगरसारख्या वसाहतीत पहिल्यांदाच कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘मिशन बिगीन’च्या तिसऱ्या टप्प्यात रस्त्यावर, दुकानात, कार्यालयात वर्दळ वाढली असताना दुसरीकडे रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. गेल्या पाच दिवसांत १५४ रुग्णांची नोंद झाली आहे. यात आज ४२ रुग्णांची भर पडली. या रुग्णांसह नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या ७८१ वर पोहचली आहे. मार्टिननगर, शिवाजीनगरसारख्या वसाहतीत पहिल्यांदाच कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
मेयोच्या प्रयोगशाळेतून आज ९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात पहिल्यांदाच जरीपटका येथील मार्टिननगर येथे रुग्णाची नोंद झाली. नाईक तलाव व बांगलादेश येथील सात रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर हिंगण्यामधून आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेतून ३२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात नाईक तलाव, बांगलादेश येथून २२ तर हंसापुरी येथील चार रुग्णांचा समावेश आहे. याच प्रयोशाळेतून उर्वरित सहा रुग्णांचे नमुने रात्री उशिरा पॉझिटिव्ह आले. यामळे वसाहतींची नावे माहिती होऊ शकली नाहीत.
खासगी लॅबमधून युवती पॉझिटिव्ह
शिवाजीनगर येथील २८ वर्षीय युवतीला गेल्या काही दिवसांपासून न्युमोनियाची लक्षणे होती. एका खासगी हॉस्पिटलमध्ये तपासणी केल्यावर डॉक्टरांनी कोविडची तपासणी करण्यास सांगितले. यात ही युवती पॉझिटिव्ह आली आहे. या युवतीला मेडिकलमध्ये रात्री उशिरा दाखल करण्यात आले. पॉश वसाहत म्हणून ओळख असलेल्या शिवाजीनगरातून पहिल्यांदा रुग्णाची नोंद झाली. -नाईक तलाव,
बांगलादेश वसाहतीतून पुन्हा २९ रुग्ण
सतरंजीपुरानंतर मोमिनपुरा तर आता नाईक तलाव व बांगलादेश येथून सर्वाधिक रुग्णांची नोंद होत आहे. आज २९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत या वसाहतीतून ९० रुग्णांची नोंद झाली आहे. हॉटस्पॉट ठरलेल्या या दोन्ही वसाहतीतून गेल्या चार दिवसांत ४००वर नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
पाच दिवसात १५४ रुग्णांची नोंद
गेल्या पाच दिवसात दीडशेवर रुग्णांची नोंद झाली. ५ जून रोजी ५६, ६ जून रोजी १०, ७ जून रोजी १५, ८ जून रोजी ३१ तर ९ जून रोजी ४२ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.
५२१ रुग्ण रुग्णालयातून घरी
कोविड विषाणूच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ७८१ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून ५२१ रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी परतले. यात आज २८ रुग्णांची भर पडली. मेयोमधून ११ तर मेडिकलमधून १७ रुग्णांना ‘डिस्चार्ज’ म्हणजे रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यात मोमिनपुरा येथील आठ तर, तीन रुग्ण गोळीबार चौक परिसरातील आहेत. हे सर्व रुग्ण मेयो येथे भरती होते. मेडिकलमध्ये उपचारानंतर सुटी देण्यात आलेल्यांमध्ये नाईक तलाव येथील पाच, कोरोडी येथील तीन, मोमिनपुरा येथील तीन रुग्णांचा समावेश आहे. यांना पुढील १४ दिवस ‘होम आयसोलेशन’मध्ये राहायचे आहे.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित १३२
दैनिक तपासणी नमुने ६५७
दैनिक निगेटिव्ह नमुने ६१६
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ७८१
नागपुरातील मृत्यू १५
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ५२१
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण ३१९०
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १८५०
पीडित- ७८१-दुरुस्त-५२१-मृत्यू-१५