CoronaVirus in Nagpur : नागपुरात ७१ रुग्ण पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू : ग्रामीण भागातही वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 11:14 PM2020-07-07T23:14:34+5:302020-07-07T23:16:01+5:30
नागपुरातही रॅपिड अॅण्टिजेन चाचणीला मंगळवारपासून सुरूवात झाली. १५ मिनिटात कोरोना पॉझिटिव्ह अहवाल उपलब्ध झाल्याने मंगळवारी ७१ रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची संख्या १,८६५ वर पोहचली. यात भांडेवाडी येथील रुग्णाच्या मृत्यूने मृतांची संख्या २७ झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातही रॅपिड अॅण्टिजेन चाचणीला मंगळवारपासून सुरूवात झाली. १५ मिनिटात कोरोना पॉझिटिव्ह अहवाल उपलब्ध झाल्याने मंगळवारी ७१ रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची संख्या १,८६५ वर पोहचली. यात भांडेवाडी येथील रुग्णाच्या मृत्यूने मृतांची संख्या २७ झाली. विशेष म्हणजे, आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये मध्यवर्ती कारागृहातील २३ बंदिवान आहेत, येथील रुग्णांची संख्या १२६ झाली आहे. शहरासोबतच ग्रामीण भागातही रुग्ण वाढत आहेत. कुही तालुक्यात पहिल्यांदाच रुग्णाची नोंद झाली. कोरोनावर मात करण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचे निदान होणे गरजेचे आहे. कोरोनाच्या तपासण्यांना वेग येण्यासाठी नागपुरातही रॅपिड अॅण्टिजेन चाचणीला परवानगी दिली. यामुळे आजपासून मेयोच्या प्रयोगशाळेत चाचणीला सुरुवात झाली. या महिन्यात दुसऱ्यांदा ७० वर रुग्णांनी उच्चांक गाठला. मेयोच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये हसनबाग, बजेरिया, रामदासपेठ व नारा येथील प्रत्येकी एक रुग्ण तर रॅपिड चाचणीतून तपासण्यात आलेले कारागृहातील २३ बंदिवान, हिंगणा व काटोल तालुक्यातील प्रत्येकी एक असे २९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. एम्सच्या प्रयोगशाळेत १७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यातील १५रुग्ण पाचपावली क्वारंटाईन सेंटर तर एक रुग्ण एम्सच्या ओपीडीतील होता. मेडिकलच्या प्रयोगशाळेतून ११ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यातील कुही तालुक्यातील एक तर उर्वरित रुग्ण हे व्हीएनआयटी क्वारंटाईन सेंटरमधील आहेत. खासगी लॅबमधूनही ११ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यातील सात नागपूरचे तर दोन अमरावती येथील आहेत. मेयोमध्ये उपचार घेत असलेल्या ४५ वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या रुग्णाला दारूचे व्यसन व श्वसनाचा विकार होता. या महिन्यातील हा दुसरा मृत्यू आहे. आज आठ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. बरे झालेल्या रुग्णांची संख्या १,३८५ झाली आहे.
१७००वर बंदिवानांची रॅपिड तपासणी
मध्यवर्ती कारागृहात १८०० वर बंदिवान आहेत. यातील साधारण १०० वर बंदिवानांची तपासणी होऊन गेली आहे. उर्वरित १७००वर बंदिवानांची रॅपिड चाचणी करण्याची माहिती, नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी दिली.
कुही तालुक्यात कोरोनाचा शिरकाव; काटोलमध्ये आठ रुग्ण
कुही तालुक्यातही आता कोरोनाचा शिरकाव झाला. पॉझिटिव्ह आलेला रुग्ण हा आपत्ती व्यवस्थापनातर्फे रत्नागिरी येथे गेला होता. कुही येथे आल्यानंतर तो होम क्वारंटाईन होता. त्याची तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. काटोलमध्ये आज आठ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. तालुक्यात रुग्णसंख्या २२ वर पोहचली आहे. कामठी येथेही आज एक ४९ वर्षीय रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी येथील ३५ वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आली. वाडीत पाचवा कोरोना रुग्ण, तर लाव्हा येथे पहिल्या रुग्णाची नोंद झाली.
संशयित : १,८८०
अहवाल प्राप्त : २७,७६१
बाधित रुग्ण : १,८६५
घरी सोडलेले : १,३८५
मृत्यू : २७